
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : आठवा तो कोरोनाचा भयानक काळ….जेव्हा लोक घरात बंद होते आणि डॉक्टर स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुग्णांवर उपचार करत होते. डॉक्टरांचे हे योगदान खरंच कौतुकास्पदच आहे.ते लोकांना जीवन देतात. कोणत्याही साथीच्या आजारात ते आपला जीव धोक्यात घालून रात्रंदिवस रुग्णांची काळजी घेतात, त्यांचा जीव वाचवतात. राष्ट्रीय डॉक्टर्स दिन दरवर्षी एक जुलै रोजी अशा डॉक्टरांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो, जे रुग्णांना आपले कुटुंब मानतात आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करतात म्हणूनच डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो.
आमच्या डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांना पाहूनच मला खूप बरे वाटते, अशा प्रतिक्रिया अनेकवेळा रुग्णांकडून ऐकायला मिळतात. औषधे ही शारीरिक आजारांना बरे करतात; पण मानसिक स्वास्थ्य हे डॉक्टरांच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहूनच मिळते. अनेकांना हा अनुभव आलेला असेलच.
स्त्रीरोग तज्ज्ञ (गायनॅकॉलॉजिस्ट)
या नावातच त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांचे स्वरूप स्पष्ट होते. त्यांच्याकडे महिला रुग्ण आणि गर्भवती महिला या तपासणीसाठी येत असतात. त्यामुळे मातृत्व, वात्सल्याची भावना त्या डॉक्टरांच्या बोलण्यातून अधिक दिसून येते. या डॉक्टरांचे बोलणे हळूवार असते. महिलांशी योग्य पद्धतीने ते संवाद साधतात. महिलांशी संवाद साधत असल्यामुळे अन्य व्यक्तींशी संवाद साधतानाही ते त्याच पद्धतीने मृदू भाषेत बोलतात.
लहान मुलांचे डॉक्टर (पिडियाट्रिक्स)
हे सर्व डॉक्टरांपेक्षा वेगळे असतात. कारण, दरदिवशी हट्टी, शांत, खोडकर, सतत वळवळ करणाऱ्या, कोणाचेही न ऐकणाऱ्या अशा विविध मुलांशी त्यांना बोलायचे असते. त्यामुळे ते प्रेमळ आणि वेळेला कडक वागणारे असतात. समोर ज्या पद्धतीचे मूल असेल त्याप्रमाणेच ते स्वत:च्या बोलण्या-वागण्यात बदल करत असतात. लहान मुलांचे लाडके डॉक्टर होण्यासाठी ते अनेक कौशल्ये स्वत:मध्ये विकसित करत असतात. त्याचा परिणाम असा होतो की, अनेकदा मोठ्या व्यक्तींशी बोलतानाही त्यांच्या बोलण्यात लहान मुलांचा खोडकरपणा, मिश्किलपणा पाहायला मिळतो.
त्वचारोग तज्ज्ञ (डर्मटोलॉजिस्ट)
यांचा संबंध त्वचेशी म्हणजेच सौंदर्याशी आणि नाजूकपणाशी आहे. सौंदर्याशी या डॉक्टरांचा संबंध येत असल्यामुळे या डॉक्टरांचे राहणीमान नेहमीच टापटीप असते. अन्य डॉक्टरांपेक्षा कपड्यांबाबत, दिसण्याबाबत हे डॉक्टर अधिक काटेकोर असतात. हे डॉक्टर सहसा घाईत आणि पटापट बोलताना आढळत नाहीत. शांतपणे हळूवार बोलतात. रुग्ण समोर नसतानाही हे डॉक्टर अत्यंत हळूवार बोलतात. यांच्या चालण्या-बोलण्यातून मृदूता आढळून येते.
जनरल मेडिसिनचे डॉक्टर
हे बोलताना तर्कशुद्ध पद्धतीने बोलतात. समाजात काम केले असल्यामुळे या डॉक्टरांचे संभाषण कौशल्य चांगले असते. संशोधनवृत्ती आणि तर्कशुद्धता यांच्या बोलण्यातून दिसून येते. अभ्यासपूर्ण गोष्टी बोलण्याकडे या डॉक्टरांचा भर असतो.