
दैनिक चालु वार्ता पालघर प्रतिनीधी – रवी राठोड
पालघर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे शिल्पकार कै. मा. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेच्या जननायक बिरसा मुंडा समिती सभागृहात करण्यात आले. जिल्हा परिषद पालघर व पंचायत समिती पालघरच्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा सन्मान, कृषी विषयक मार्गदर्शन आणि प्रेरणादायी अनुभव यांचा प्रत्यय आला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर, कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी दहिफळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद शरीक मसलत, चंद्रशेखर जगताप, उपविभागीय कृषी अधिकारी विश्वास बर्वे, तालुका कृषी अधिकारी ए. एस. बागुल, गट विकास अधिकारी बापूराव नाळे, तसेच सर्व विभागप्रमुख, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला स्व.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी आपल्या भाषणातून शेतीच्या महत्वावर प्रकाश टाकत, “शेती ही केवळ उपजीविकेचे साधन नसून समाजघटक उभारणारी शक्ती आहे. स्थलांतरासारख्या गंभीर समस्येवर शेती हा ठोस पर्याय ठरू शकतो,” असे मत मांडले. त्यांनी मोखाडा तालुक्यातील पांडुरंग चौधरी यांचे विशेष कौतुक करत, “ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे आयडॉल आहेत,” असे गौरवोद्गार काढले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या सन्मानासंदर्भात बोलताना, “ज्यांचा सत्कार झाला आहे, त्यांनी योजनांचा योग्य उपयोग करून शेतीत प्रगती केली आहे. इतर शेतकऱ्यांनीही यांचे अनुकरण करावे,” असे आवाहन केले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर यांनी आधुनिक शेतीच्या गरजेवर भर देत “शेतीमध्ये पारंपरिक ज्ञानाबरोबर आधुनिकतेची जोड देणे काळाची गरज आहे. शेती ही अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया आहे.”असे सांगितले.
कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. दहिफळे यांनी शेतीत नवकल्पना आणि प्रयोगशीलतेचे महत्त्व पटवून दिले. “प्रगतीसाठी प्रयोग आवश्यक आहेत. संशोधनातील तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे आमचे ध्येय आहे,” असे त्यांनी सांगितले.
प्रभारी कृषी विकास अधिकारी स्मिता पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले.
यावेळी खरीप हंगाम पिकस्पर्धा २०२४ अंतर्गत आदिवासी व सर्वसाधारण गटांतील तीन विजेत्या शेतकऱ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. तसेच प्रगतशील शेतकऱ्यांचा आंब्याचे रोप, गांडूळ खत व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.
काही शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवातून शेतीतील अडचणी, नविन प्रयोग आणि आपल्या यशाचे अनुभव उपस्थितांसमोर कथन केले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी शेती उत्पादनांवर आधारित प्रक्रिया वस्तू, स्थानिक रानभाज्या आणि इतर उत्पादने यांचे लघु प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाला उपस्थित मान्यवरांनी भेट देऊन कौतुक केले. शेवटी, कृषी दिनाच्या औचित्याने मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.