चालू वार्ता माळशिरस प्रतिनिधी-राजेंद्र पिसे
माळशिरस : आत्मसंयम, श्रद्धा आणि भक्तीचा संदेश देणारा रमजान महिना सध्या सुरू असून सर्वत्र आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळत आहे. रोजाच्या निमित्ताने मुस्लिम बांधव उपवास, नमाज आणि प्रार्थनेत मग्न आहेत. या पवित्र काळात माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील अवघ्या सात वर्षीय नुरेनफातिमी शौकत तांबोळी हिने कडक उन्हात आपला पहिला पूर्ण रोजा यशस्वीपणे पूर्ण करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
फेब्रुवारी महिन्यातील वाढत्या तापमानात दिवसभर अन्न-पाण्याचा त्याग करणे मोठ्यांसाठीही कठीण ठरते. मात्र नुरेनफातिमी हिने पहाटे ५.२६ वाजता सहेरी करून रोजाची सुरुवात केली आणि दिवसभर संयम राखत सायंकाळी ६.४३ वाजता इफ्तार करून आपला पहिला रोजा पूर्ण केला.
अवघ्या लहान वयात दाखवलेली तिची जिद्द, संयम आणि श्रद्धा परिसरात प्रेरणादायी ठरत असून तिच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. नागरिकांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
