चालू वार्ता माळशिरस प्रतिनिधी-राजेंद्र पिसे
नातेपुते :येथील अकरावीतील विद्यार्थी श्रीतेज पवार याने छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाच्या स्मृती जागवण्यासाठी ‘बलिदान मास’ पाळत एक प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे. स्वराज्य आणि धर्मरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या त्यागगाथेची जाणीव तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा ध्यास श्रीतेजने घेतला.
या उपक्रमांतर्गत श्रीतेजने महाराजांच्या जीवनातील संघर्षमय प्रसंगांवर आधारित संवाद व चर्चासत्रांचे आयोजन केले. तसेच छावा यांसारख्या ऐतिहासिक कादंबऱ्यांचे वाचन करून त्यावर विचारमंथन घडवून आणले. बलिदान दिनानिमित्त महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मौन पाळत अभिवादन करण्यात आले.
यावेळी श्रीतेज पवार म्हणाला, “छत्रपती संभाजी महाराज हे केवळ इतिहासातील व्यक्तिमत्त्व नसून ते तरुणांसाठी संघर्ष आणि त्यागाचे प्रतीक आहेत. कठीण प्रसंगात न डगमगता स्वार्थापेक्षा स्वराज्याला प्राधान्य कसे द्यावे, हे त्यांच्या जीवनातून शिकण्यासारखे आहे. म्हणूनच ‘बलिदान मास’ माझ्या पद्धतीने साजरा करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.”
अल्पवयीन असूनही इतिहासाबद्दल असलेली श्रीतेजची निष्ठा आणि समाजजागृतीची भावना पाहून परिसरातील नागरिक तसेच ज्येष्ठ इतिहासप्रेमींकडून त्याचे कौतुक होत आहे. भविष्यात अशा उपक्रमांमुळे तरुणांना इतिहासाची खरी आणि प्रेरणादायी ओळख मिळेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
