चालू वार्ता माळशिरस प्रतिनिधी-राजेंद्र पिसे
नातेपुते :नातेपुते नगरपंचायत येथे सर्व विषय समित्यांच्या सभापती व सदस्य पदांची मुदत २७ फेब्रुवारी २०२६ रोजी संपल्याने नव्या सभापतींची निवड प्रक्रिया पार पडली. जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या आदेशानुसार ही विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.
पीठासीन अधिकारी म्हणून श्री. लक्ष्मीकांत कहार (मुख्याधिकारी, दुधणी) यांनी कामकाज पाहिले. तसेच नातेपुतेचे मुख्याधिकारी विकास शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडली.
निवडीनुसार बांधकाम समितीच्या सभापतीपदी श्री. सुरेंद्र छगन सोरटे यांची निवड झाली. पाणीपुरवठा, स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतीपदी सौ. भारती बापूराव पांढरे यांची निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सौ. दीपिका अमरसिंग देशमुख यांची निवड झाली. नगराध्यक्ष सौ. अनिता लांडगे या पदसिद्ध सभापती म्हणून स्थायी समितीच्या अध्यक्षस्थानी राहतील, तर उपनगराध्यक्ष श्री. अतुल राजेंद्र पाटील यांची नियोजन व विकास समितीच्या पदसिद्ध सभापतीपदी निवड झाली.
या बैठकीस नगरसेवक मालोजीराजे देशमुख, रणजीत पांढरे, अण्णासाहेब पांढरे, सुरेंद्र सोरटे, दीपिका देशमुख, उत्कर्षाराणी पलंगे, अनिता लांडगे, संगीता काळे, स्वाती बावकर, भारती पांढरे तसेच रणवीर देशमुख, बाळासाहेब काळे आदी उपस्थित होते.
सभेचे कामकाज सभा अधीक्षक प्रदीप वनसाळे यांनी पाहिले. निवडीनंतर नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन करण्यात आले.
