अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके
अंबड : संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून डेबूजी परीट समाज व गुरु-शिष्य परिवाराच्या वतीने आयोजित कार्यक्रमात, स्वप्नपूर्ती महिला फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सुमनताई विष्णूकुमार शेळके यांना प्रतिष्ठित ‘गुरु-शिष्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते हा गौरव सोहळा पार पडला.
अमरधाम येथे आयोजित या कार्यक्रमात रक्तदान शिबिरासह सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर उद्योजक सुनील रायठ्ठा, डायटचे प्रा. प्रमोद कुमावत, डॉ. प्रकाश मान्टे, विष्णूकुमार शेळके (संस्थापक, कुणबी मराठा समाज विकास मंच), सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी मधुकर जोशी, मोहन इंगळे, किशोर आगळे, सुभाष वाघमारे, किशोर खंडाळे, मुख्याध्यापिका लता जाधव, नगरसेविका कार्तिक इंगळे, संतोष रेगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
२,००० हून अधिक महिलांना स्वावलंबनाची दिशा
सुमनताई शेळके यांनी गेल्या काही वर्षांत २ हजारांहून अधिक महिलांना विविध लघुउद्योगांचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे. ब्युटी पार्लर, शिवणकाम, मेंहदी डिझाईन आणि केक मेकिंग यांसारख्या कौशल्यांचे मार्गदर्शन करून त्यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे.
विशेष उल्लेखनीय कार्य:
निराधार, विधवा आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतील महिलांना सुमनताई निःशुल्क प्रशिक्षण देतात. केवळ प्रशिक्षणच नव्हे, तर त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन सन्मानाने जगण्याचे बळ त्यांनी दिले आहे.
गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा
सुमनताईंचे हे कार्य संत गाडगेबाबांच्या दशसूत्रीतील समाजसेवेचा प्रत्यय देणारे आहे. महिला सक्षमीकरण, स्वावलंबन आणि सामाजिक न्यायाच्या घटनात्मक तत्त्वांना बळकटी देणाऱ्या या कार्याचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी विशेष कौतुक केले. त्यांच्या या कार्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य लाभले असून, आजही त्यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी तरुण मुली व महिलांचा ओघ वाढत आहे.
पुरस्कार मिळाल्याबद्दल सुमनताई शेळके यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
