दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड/प्रेम सावंत
परळी: शहरातील खिलाडी स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने बीड जिल्हा तायक्वांदो संघटनेच्या अंतर्गत तायक्वांदो बेल्ट परीक्षा रविवार, दिनांक १ मार्च रोजी अत्यंत शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात पार पडली. या परीक्षेत एकूण २५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या तांत्रिक कौशल्यांचे, शारीरिक क्षमतेचे आणि आत्मविश्वासाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
या बेल्ट परीक्षेसाठी गंगाखेड येथील फायटर्स ग्रुप स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थाचालक व मुख्य कोच प्रा. चैतन्य दौलत पाळवदे यांना मुख्य परीक्षक म्हणून विशेष आमंत्रित करण्यात आले होते. मुख्य परीक्षक म्हणून कार्य करताना प्रा. पाळवदे यांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या किक्स, ब्लॉक्स, पुमसे, फायटिंग स्किल्स आणि शिस्त यांचे सूक्ष्म परीक्षण केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी केवळ परीक्षा न घेता त्यांच्या भावी क्रीडा प्रवासासाठी प्रेरणादायी सूचना दिल्या.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पीएसआय दीपक राठोड, डॉ. मुंडे आणि श्रीमती सारडा यांची मान्यवर उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष व मुख्य प्रशिक्षक अंकुश गायकवाड यांनी केले. परमेश्वर होळकर, भाकरे व संपूर्ण टीमने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भक्कम साथ दिली. गंगाखेड येथील बॉक्सिंग राज्यस्तरीय खेळाडू व प्रशिक्षक प्रताप भावे यांनीही विशेष सहकार्य केले.
परळी आणि गंगाखेड या दोन शहरांमधील क्रीडा क्षेत्रात सशक्त दुवा निर्माण करण्याचे काम या कार्यक्रमातून झाले. बेल्ट परीक्षा, मार्शल आर्ट्स स्पर्धा आणि विविध क्रीडा उपक्रमांमधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि उपस्थिती ही या उपक्रमाच्या यशाची साक्ष देणारी ठरली.
यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व बेल्ट प्रदान करताना उपस्थितांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले. परळीच्या क्रीडा क्षेत्रात खिलाडी स्पोर्ट्स अकॅडमीने उभारलेली ही कामगिरी आणि गंगाखेडच्या सहकार्याने निर्माण झालेला क्रीडा सेतू भविष्यात आणखी मोठ्या यशाचा पाया ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
