
दैनिक चालु वार्ता डहाणू प्रतिनिधी-सुधीर घाटाळ
डहाणू, ३ जुलै, डेंग्यू प्रतिरोध महिना निमित्त रायतळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (गडगपाडा) येथे डेंग्यू, हिवताप व चिकनगुनिया या आजारांबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम जिल्हा हिवताप कार्यालय पालघर व प्रा.आ. केंद्र गंजाड अंतर्गत उपकेंद्र रायतळी यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आला.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना डासांपासून होणारे आजार, त्यांची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय याबाबत माहिती देण्यात आली. आरोग्य कर्मचारी दिगांबर भोयर यांनी डास निर्मूलनाचे उपाय, डेंग्यूचा प्रसार कसा होतो, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे महत्त्व, मच्छरदानीचा वापर, घरातील पाणी साठवणारी भांडी झाकून ठेवणे, परिसर स्वच्छ ठेवणे यासारख्या महत्त्वाच्या बाबी विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गणेश कनोजा सर, शिक्षक वृंद, आरोग्यसेविका सुमन शनवार, आशा स्वयंसेविका मंजुळा गुहे यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.