
दैनिक चालु वार्ता उपसंपादक धाराशिव- नवनाथ यादव
धाराशिव/भूम (प्रतिनिधी): पाण्याच्या शाश्वत व शुद्ध पुरवठ्यासाठी केंद्र शासनाची अमृत २.० योजना भूम शहरात प्रभावीपणे राबविण्याच्या मागणीसाठी गुरुवारी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी रस्त्यावर उतरून जोरदार एल्गार केला. महिलांची लक्षणीय उपस्थिती आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग या रॅलीचे खास आकर्षण ठरले.
सकाळी साडेअकरा वाजता मेहंतीशावली दर्गा येथून निघालेली रॅली वीर सावरकर चौक, महात्मा गांधी चौक, नागोबा चौक, ओंकार चौक मार्गे गोलाई चौक येथे जाऊन सभेत रुपांतरित झाली. “आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी, अमृत २.० ला साथ द्या” अशा घोषणा देत नागरिकांनी शहर दणाणून सोडले.
रॅलीमध्ये माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, माजी नगराध्यक्षा संयोगिता गाढवे, कृती समिती अध्यक्ष दिलीप गाढवे, ऍड. पंडित ढगे, रोहन जाधव, नारायण वरवडे, भागवत शिंदे, ऍड. रणजित साळुंके, डॉ. रामराव कोकाटे, अमोल भोसले, प्रभाकर हाके, पोपट जाधव, ह.भ.प. योगेश आसलकर, तोफीक कुरेशी, संजय होळकर, अरुण देशमुख, सुरज गाढवे, बालाजी अंधारे,बालाजी माळी, बाळासाहेब गवळी यांच्यासह अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
गोलाई चौकात पार पडलेल्या सभेमध्ये भूम नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शैला डाके यांना योजनेच्या पाठिंब्याचे निवेदन देण्यात आले. रॅलीदरम्यान नागरिकांसाठी माहिती फलक, पोस्टर्सद्वारे योजनेचे जनजागृतीही करण्यात आली. विशेष म्हणजे भर पावसातही नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती.
संजय गाढवे म्हणाले, “अमृत २.० योजना ही भूमच्या भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. मी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून ही योजना मंजूर करून घेतली आहे. काही विरोधक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योजनेचा अपप्रचार करत आहेत, पण ही योजना जनतेच्या हितासाठीच आहे.”
ते पुढे म्हणाले, “योजनेत प्रत्येक नळाला मीटर बसवण्याची तरतूद आहे, मात्र मी आणि माझे सहकारी नगरपालिकेत असताना मीटरच्या आधारे पाणीपुरवठा होणार नाही, तसेच सध्याची नळपट्टी पुढे जाणार नाही याची ग्वाही आम्ही देतो.”
तसेच रॅलीदरम्यान काही समाजकंटकांकडून कामगारांना मारहाण करण्यात येत असल्याच्या घटनांचा निषेध करण्यात आला आणि अशा तत्वांना प्रशासनाने आवर घालावा, अशी मागणीही उपस्थित नागरिकांनी केली