
दैनिक चालु वार्ता ठाणे-प्रतिनिधी- नागेश पवार
————-
दिवा : दिवा-आगासन रोडवरील बेडेकर नगर येथे आज सकाळी सुमारे ११:१५ वाजता एक दुर्दैवी अपघात घडला. रस्ता ओलांडत असताना भरधाव ट्रकखाली आल्याने दिपक हेमले ६० वर्षे (अंदाजे) या ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला.
दिपक हेमले हे एका डोळ्याने अंध होते परंतु घटने मागची सत्यता अद्याप स्पष्ट झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच दिवा पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह त्वरित रुग्णवाहिकेद्वारे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले.
दिपक हेमले यांच्या पश्चात त्यांची पत्नी आशा हेमले, ओंकार आणि प्रणव हेमले अशी दोन मुले, सून माधुरी हेमले व दोन नातवंडे असा परिवार आहे. अपघातानंतर ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास दिवा पोलीस करत आहेत.