
दैनिक चालु वार्ता डहाणू प्रतिनिधी-सुधीर घाटाळ
धुंदलवाडी ते उधवा जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यात साचलेल्या पाण्यामुळे प्रवास धोकादायक बनला आहे. या दुरवस्थेला कंटाळलेल्या तोरणेपाडा परिसरातील ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने निषेध करत आपला संताप व्यक्त केला. रस्त्यावरच भात रोपणी करत त्यांनी निष्क्रिय प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.
सध्या पालघर जिल्ह्यात भातलागवडीचा हंगाम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, रस्त्यावर साचलेल्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमध्ये ग्रामस्थांनी प्रतिकात्मक भात रोपणी करत प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. जर अशीच स्थिती कायम राहिली, तर भविष्यात शेतात नव्हे, तर रस्त्यावरच शेती करावी लागेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.धुंदलवाडी, हळदपाडा, मोडगाव आणि उधवा ही गावे जोडणारा सुमारे सहा किलोमीटर लांबीचा राज्यमार्ग गेल्या काही वर्षांपासून वारंवार खराब होत आहे. चार – पाच वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, अल्पावधीतच डांबर निघून गेला असून, संपूर्ण मार्ग खड्ड्यांनी भरला आहे. पावसामुळे खड्ड्यांत पाणी साचले असून, त्यामुळे वाहनचालकांना मार्ग ओळखणं कठीण झाले आहे. परिणामी अपघातांची शक्यता वाढली असून, प्रवासी, विद्यार्थी, रुग्णवाहिका चालक आणि सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून, त्यामुळेच ही अवस्था उद्भवली आहे. अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.पावसाळ्यानंतर तातडीने रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच जर लवकरात लवकर रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही, तर अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. धुंदलवाडी-उधवा हा रस्ता महाराष्ट्र आणि केंद्रशासित दादरा-नगर हवेलीला जोडणारा महत्त्वाचा दळणवळण मार्ग असल्याने त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.या आंदोलनात अविनाश मिसाळ, जयेश चौधरी, सरपंच रंजना चौधरी, ग्रामपंचायत सदस्य लुकेश भोये, ज्योती भुरभुरे, सपना चौधरी, अरुण मिसाळ, राहुल भोये, नितेश भोये यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते.