
शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रताप जाधवांचे विधान !
शिवसेना खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांनी केलेल्या एका विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘जय गुजरात’ म्हंटल्याने वाद निर्माण झाला.
त्यानंतर आता केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी एक दावा केला.
महाराष्ट्र आणि गुजरात हे एकच राज्य असताना मुंबई ही गुजरातची राजधानी होती. गुजरात हे आपलेच शेजारी राज्य आहे, ते पाकिस्तानात नाही, त्यामुळे त्यावरून राजकारण करु नका,” असे विधान प्रताप जाधव यांनी केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
‘गुजरात हा काही पाकिस्तानचा प्रांत नाही’
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, “संयुक्त महाराष्ट्र ज्यावेळी होता त्यावेळी मुंबई ही गुजरातचीही राजधानी होती. मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गुजराती लोक राहतात. गुजरात हा काही पाकिस्तानचा प्रांत नाही, आपल्याच शेजारचे राज्य आहे. त्यामुळे अशा गोष्टीचे राजकारण करायला नको. ज्या ज्या कार्यक्रमात आम्हाला बोलावलं जातं त्यावेळी आम्ही आमचा स्वाभिमान जपून त्यांचाही स्वाभिमान जागृत करतो. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी केलेले वक्तव्य चुकीचं नाही.
पुढे जाधव म्हणाले, “उद्धव ठाकरेंना हा प्रश्न कुणी का विचारत नाही. शिवाजी पार्कवरून बाळासाहेब ठाकरे तमाम ‘हिंदू बांधवांनो’ म्हणायचे. उद्धव ठाकरे ते विसरले. त्यांनी हिंदुत्व का सोडला याबाबत कोणी विचारत नाही. दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही या म्हणीप्रमाणे त्यांची अवस्था झाली आहे,” अशी टीका प्रतापराव जाधव यांनी केली.
दरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत पुण्यामध्ये गुजराती समाजाचा एक कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शाहांची स्तुती केली आणि भाषणाच्या शेवटी ‘जय गुजरात’चा नारा दिला. यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली.