
राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर रश्मी ठाकरे खळखळून हसल्या, भाषण संपल्यानंतर नेमकं काय घडलं ?
गेल्या अनेक वर्षांपासून ‘ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजेत’, ही राजकीय वर्तुळात कायम रंगणारी चर्चा शनिवारी प्रत्यक्षात उतरली. राज्यातील शाळांमध्ये पहिली इयत्तेपासून हिंदी सक्तीविरोधात एकत्र आलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे शनिवारी विजयी मेळाव्याच्या निमित्ताने एका व्यासपीठावर आले होते.
यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे यांनी घणाघाती भाषणं करुन महायुती सरकारला लक्ष्य केले. या सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर संपूर्ण ठाकरे कुटुंब हे जुने वाद विसरुन एकत्र आलेले पाहायला मिळाले. यावेळी राज ठाकरे आणि रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्यातील संवादाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओत राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे स्टेजच्या खाली एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना जवळ बोलावून घेतले. त्यावेळी रश्मी ठाकरेही समोर होत्या. त्यांच्याकडे पाहून राज ठाकरे म्हणाले की, ‘मी बरोबर बोललो की नाही?’. यापुढचा नेमका संवाद व्हिडीओत ऐकू येत नाही. मात्र, राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर रश्मी ठाकरे अगदी दिलखुलासपणे हसल्या. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कालच्या विजयी मेळाव्याच्या निमित्ताने अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोन्ही चुलत बंधूदेखील एकत्र येताना दिसले. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांनी व्यासपीठावर एकमेकांची गळाभेट घेतली. तसेच दोघांनी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवत मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना अभिवादन केले.