प्रेग्नेंट राहिल्यावर रबडीमधून गर्भपाताची गोळी;पुण्यात खळबळ…
पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. शहरात जणू क्राइमची मालिकाच सुरु आहे. अशातच एक धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. लग्नाचं आमिष दाखवून वेळोवेळी तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केला.
त्यानंतर तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिला नकळत रबडीमध्ये गर्भपाताची गोळी मिसळवून जबरदस्तीने गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत घडला आहे.
आदर्श वाल्मीक मेश्राम असं आरोपीचं नाव असून एका २८ वर्षीय तरुणीने सोमवारी हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये आदर्श वाल्मीक मेश्राम विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदर्श मेश्राम याने लग्नाचं आमिष दाखवून संबंधित तरुणीशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. यामध्ये ती गर्भवती राहिल्यानंतर तिच्या संमतीशिवाय तिला नकळत आरोपी आदर्श मेश्राम याने रबडीमध्ये गर्भपाताची गोळी मिसळून ती खाऊ घातली. त्यामुळे तिचा गर्भपात झाला, त्यानंतर आरोपी आदर्श मेश्राम याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पीडितेनं हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे.
धर्मगुरू अन् नणंदेकडून ख्रिश्चन धर्मांतरासाठी दबाव
दरम्यान, पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी विवाहितेवर तिच्या नणंदेसह एका धर्मगुरूकडून जबरदस्ती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ख्रिश्चन धर्म स्वीकारत नसल्यामुळे नणंदेनं महिलेला मारहाण केली. तसेच धर्मगुरूंनी तिला धमकी दिली. याच त्रासाला कंटाळून अखेर महिलेनं पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, १९ वर्षीय पीडित महिलेच्या नणंदेनं विवाहितेवर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकला होता. जेव्हा विवाहित महिलेनं नकार दिला, तेव्हा महिलेला मारहाण करण्यात आली होती. तसेच नणंदेनं शिवीगाळ केली. या प्रकरणात फ्रान्सिस नावाच्या व्यक्तीने विवाहितेला धर्मांतरासाठी दबाव टाकला होता. ‘मी बाटलीतून आणलेले पाणी प्यायले नाहीस..धर्म स्वीकारला नाहीस तर तुझ्याविरुद्ध पोलिसात खोटी तक्रार दाखल केली जाईल’, अशी धमकी धर्मगुरूंनी दिली होती. वारंवार धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात येत होता.
