दैनिक चालू वार्ता उपसंपादक धाराशिव-नवनाथ यादव
धाराशिव/भूम (प्रतिनिधी) –
भूम तालुक्यातील रामेश्वर गावची सुकन्या सुमैया पठाण हिने आपल्या जिद्द, चिकाटी आणि कलेच्या जोरावर पुण्यासारख्या मोठ्या शहरात स्वतःचा ब्रँड निर्माण केला आहे. ‘सुमैया द डिझायनर स्टुडिओ’ या नावाने सुरू केलेल्या डिझायनर स्टुडिओला सध्या फॅशन क्षेत्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे.
या स्टुडिओला नुकतीच भूम नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ. संयोगिता (ताई) संजय गाढवे यांनी सदिच्छा भेट देऊन सुमैया पठाण यांच्या कार्याचं विशेष कौतुक केलं. त्यांच्या या भेटीद्वारे भूमच्या तरुणींना प्रेरणादायी संदेश मिळाला आहे.
विशेष म्हणजे, बिग बॉस मराठी विजेता अभिनेता सुरज चव्हाण याचे ड्रेस डिझाईन करण्याचा मानही सुमैयाला मिळाला आहे. इतकंच नव्हे, तर लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘झापूक झुपूक’ या मराठी चित्रपटातील मुख्य अभिनेत्याचे परिधानही त्यांनी डिझाईन केलं आहे.
स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवून आणि अपार परिश्रम करून सुमैयाने ग्रामीण भागातील तरुणींनाही मोठं स्वप्न बघण्याची आणि पूर्ण करण्याची प्रेरणा दिली आहे.
