
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी -प्रा. विजयकुमार दिग्रसकर
अवघ्या तीन महिन्यापूर्वी तयार झालेला मोर चौक ते विश्रामगृह हा मार्ग केबल टाकण्यासाठी खोदून ठेवला आहे. अनेक अडचणी नंतर व प्रतिक्षेनंतर ह्या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण झाले. नागरीकांनी आत्ता कुठे उसासा सोडला होता . पण नतदृष्ट पणा कंत्राटदाराचा की महानगरपालीकेचा पण चांगल्या रस्त्याचा मात्र खराबा केला आहे. जर केबल टाकायची असेल तर कंत्राटदाराला याची पूर्वकल्पना नव्हती का ? महानगर पालीकेला याची कल्पना नाही का ? बांधकाम विभागाने यात लक्ष घातले नाही का ? पावसाळाच्या सुरवातीलाच अधिकारी अशा कामांना परवानगी देतातच कसे ?असे अनेक प्रश्न नागरीकांच्या मनाला पडले आहेत. सदरील कंपनी किंवा कंत्राटदाराकडून रस्ता फोडणे किंवा नंतर दुरुस्ती करण्यासाठी अनामत रक्कम घेण्यात येते. पण नंतर काहीतरी थातुरमातुर दुरुस्ती करून अधिकारी व कंत्राटदार हे आळीमिळी गुपचिळी करतात. निदान या कामात तरी असा प्रकार न होता कंत्राटदाराकडून सदरील रस्ता पूर्ववत करून घ्यावा अशी अपेक्षा नागरीकांकडून व्यक्त होत आहे.