
दैनिक चालू वार्ता डहाणू प्रतिनिधी-सुधीर घाटाळ
डहाणू, ८ जुलै २०२५ –पालघर जिल्ह्यातील आशागड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या सरावली उपकेंद्रात गरोदर मातांच्या आरोग्य तपासणीसाठी नियोजित शासकीय शिबिर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे अपयशी ठरले आहे. या शिबिरात १३ ‘हाय रिस्क’ गरोदर महिलांची तपासणी न करता केवळ लसीकरणावर निभावून नेण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आदेशानुसार, दर मंगळवारी उपकेंद्रांच्या ठिकाणी गरोदर माता तपासणी शिबिरे घेण्यात येणार होती. यामध्ये डॉक्टर, समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य सेविकांची उपस्थिती अनिवार्य होती. मात्र, सरावली उपकेंद्रावर डॉक्टर कुणाल सोनावणे आणि समुदाय अधिकारी अनुपस्थित होते, केवळ ANM आणि आशा वर्कर्सच उपस्थित राहिल्या.आशा वर्कर्सचा गंभीर आरोप स्थानिक गावातील आशा वर्कर्सच्या म्हणण्यानुसार, डॉ. कुणाल सोनावणे हे 15 ते 20 दिवसातून काही तासांसाठी कार्यक्षेत्रात येतात. उपकेंद्रात नियमितपणे येणे, गरोदर माता व अन्य रुग्णांची तपासणी करणे, ही त्यांची जबाबदारी आहे. व काही घटना घडल्यास सर्वस्वी आमच्यावर ढकलेले जाते असा गंभीर आरोप त्यांनी केला.विशेष म्हणजे, डॉ. सोनावणे याच दिवशी त्यांच्या खासगी दवाखान्यात सेवा देताना व्हिडीओ फूटेजद्वारे दिसून आले, जेव्हा त्यांची सरकारी जबाबदारी पार पाडणं अपेक्षित होतं. सरकारी सेवेचा पगार घेत असतानाही खासगी प्रॅक्टिसवर भर देणं ही फसवणूक असून, जनतेच्या आरोग्याशी खेळण्यासारखे आहे.
जेव्हा आशागड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. क्षितिजा पाटील यांना या बाबत विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी कोणताही ठोस खुलासा न करता डॉ. सोनावणे यांची पाठराखणच केली.
यापूर्वीही कैनाड उपकेंद्रात सायनु सावर या महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा व नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडला होता. त्या प्रकरणात अजूनही योग्य कारवाई झालेली नाही.
आशागड PHC मध्ये तिघे डॉक्टर असूनही, उपकेंद्रावर एकही डॉक्टर हजर नसणे म्हणजे गंभीर प्रशासकीय निष्काळजीपणा आणि सरकारी यंत्रणेची लोकांसमोरील अपयशी प्रतिमा दर्शवते.
या प्रकाराची तात्काळ चौकशी करून दोषी वैद्यकीय अधिकारी डॉ. कुणाल सोनावणे आणि त्यांच्या समर्थनार्थ भूमिका घेणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. क्षितिजा पाटील यांच्यावर वरिष्ठ पातळीवरून निलंबन अथवा बडतर्फीची कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था,आणि ग्रामस्थांकडून होत आहे.
कोट-
“सरावली उपकेंद्रासाठी डॉक्टर नियुक्त असूनही त्यांचा उपकेंद्रातच गायब असणं, हे प्रशासनाचं अपयश नाही का? ‘हाय रिस्क’ गरोदर मातांपैकी एखादीची प्रकृती बिघडली तर जबाबदारी कोण घेणार?”
– स्थानिक ग्रामस्थ
कोट-
पुढील आठ ते दहा दिवसाच्या आत वरिष्ठ कार्यालयातून सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
पल्लवी सस्ते – गट विकास अधिकारी डहाणू