
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी : अनिल पाटणकर
पुणे : येथील धनकवडी भागात राहणारा साहिल मरगजे याने जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक परिक्षेत दैदिप्यमान यश मिळवले असून पश्चिम बंगाल मधील जलपाईगुडी येथे भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) वतीने आयोजित जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक परिक्षेत साहिल मरगजेला ‘अ’ ग्रेड सह सर्वोत्तम शिस्तीचा पुरस्कार देखील मिळाला आहे. त्यामुळे तो आता उत्तम प्रशिक्षक म्हणूनही भूमिका बजावण्यास सिद्ध झाला आहे.
पंजाब येथील पटियाला मध्ये राष्ट्रीय क्रीडा संस्थेच्या (एनआयएस) वतीने क्रीडा प्रशिक्षकांसाठी सहा आठवड्यांचा अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू असून त्या मध्ये खेळाडूंना विविध क्रीडा प्रकारात मूलभूत प्रशिक्षणासह लवचिकता, ताकद आणि समतोल साधण्याविषयी अद्यावत प्रशिक्षण दिले जाते. या परिक्षेत देशभरातील ५६ खेळाडूंनी सहभाग घेतला होता, त्यात महाराष्ट्रातून साहिल मरगजे व प्रांजल वर्मा यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये नॅशनल चॅम्पियन जिमनॅस्ट साहिल मरगजेला अ क्षेणी मिळाली असून विविध क्रीडा प्रकारातील दोनशे खेळाडूंमधून सर्वोत्तम शिस्ती चा पुरस्कारही त्याला मिळाला आहे.
साहिल बरोबरच प्रांजल वर्मा याला देखील अ ग्रेड मिळाली आहे. साहिल व प्रांजल दोघेही मागील बारा वर्षांपासून जिमनॅस्टिकचा सराव करत आहेत. त्यांना भारतीय क्रिडा प्राधिकरणाचे प्रशिक्षक शिव छत्रपती पुरस्कार विजेते रामकृष्ण लोखंडे, साई जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक, रविंद्र मंगला, एलोरा मंगला, पवन भांबुरे आणि राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते सहाय्यक पोलीस निरीक्षक सौरभ कोकाटे यांचे मार्गदर्शन लाभले.