
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी – किशोर फड
बीड/अंबाजोगाई
“महावितरण अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांना “CMD of the Year” आणि “Leadership Excellence in Technology Innovation” पुरस्काराने सन्मानित”
मुंबई – देशातील ऊर्जा क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) या अग्रगण्य महावितरण ला दि. १० जुलै २०२५ रोजी मुंबईत जागतिक मानव संसाधन विकास परिषद (World HRD Congress) यांच्या वतीने आयोजित “नॅशनल अवार्ड्स फॉर एक्सलन्स २०२५” या कार्यक्रमात एकूण सहा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या पुरस्कारांमध्ये महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांना त्यांच्या उत्कृष्ट नेतृत्वगुणांची आणि तांत्रिक क्षेत्रातील नवोन्मेषी कार्याची दखल घेत “CMD of the Year” आणि “Leadership Excellence in Technology Innovation” हे दोन मानाचे वैयक्तिक पुरस्कार देण्यात आले. या गौरवामुळे संपूर्ण महावितरण परिवारात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुरस्कार समारंभात देशभरातील नामांकित प्रतिनिधी, उद्योजक, प्रशासकीय अधिकारी, तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्वकर्ते आणि मानव संसाधन व्यवस्थापनातील तज्ज्ञ उपस्थित होते. या व्यासपीठावर महावितरणच्या नावाची घोषणा होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कौतुकाने दाद दिली.
महावितरणने मागील काही वर्षांत डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत ग्राहक सेवा, वितरण प्रणाली व कार्यप्रणालीत अभूतपूर्व सुधारणा घडवून आणल्या आहेत. “महावितरणची सेवा ही केवळ वीज पुरवठ्यापुरती मर्यादित नसून, आमचा उद्देश नागरिकांच्या जीवनात प्रकाश आणि समाधान पोहोचविणे हाच आहे. या सहा पुरस्कारांमध्ये विविध विभागांतील योगदानाचा समावेश असून, कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या संघभावना, नवोन्मेषी विचार, वचनबद्धता आणि सेवाभावना यांचा ठसा उमटला आहे. हे पुरस्कार म्हणजे संपूर्ण महावितरणच्या कार्यसंस्कृतीचे प्रतिक आहेत. ही पुरस्कार सन्मानित जबाबदारी असल्याचे जाणून, आम्ही अधिक जोमाने कार्यरत राहू,” असे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी आपली प्रतिक्रिया जनसंपर्क विभागाच्या माध्यमातून व्यक्त करताना सांगितले.