
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : वाघोली शहर वाढत असले तरी शहराच्या विकासाचा आराखडा प्रत्यक्षात दिसुनच येत नाही. शहरात आता चौफेर बाजारहाट झाली असली तरी आव्हाळवाडी चौकात असलेल्या भाजी मंडीतही भाजी घेणार्यांची संख्या मोठी आहे.स्वच्छतेचा नारा दिला जात असला तरी दुर्देवाने हा बाजारच पावसाळ्यात अक्षरश: चिखलात भरतो आणि भाजी विक्रते त्याच परिसरात सडलेला भाजीपाला टाकत असल्याने या परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने भाजी बाजारातून नाकाला रूमाल लावल्याशिवाय फिरून दाखवा असा प्रश्न महानगरपालिकेला विचारला जात आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात आव्हाळवाडी चौकात असलेला भाजी बाजार अनेक वर्षांपासून अत्यंत वाईट स्थितीत आहे. मूलभूत सुविधा पूर्णपणे नसल्याने आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहे.शहराच्या हृदयस्थानी असलेला भाजी बाजार बस स्थानकाच्या मध्यभागात असल्याने आलेल्या पाहुण्यांचे दुर्गंधीयुत किळसवाणा बाजार स्वागत करते.
या भाजी बाजारात वाहनतळाचा पूर्ण अभाव असुन दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी कोणतीही नियोजित पार्किंग नाही. यामुळे वाहतूक कोंडी होऊन रोजच हातापायी होते. बाजारात खड्ड्यांनी भरलेले, कच्चे व पावसाळ्यात चिखलयुत रस्ते आहेत. नियंत्रणशून्य व्यवस्थेमुळे खरेदीदार व विक्रेते दोघेही त्रस्त आहेत. कचरा टाकण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. या परिसरात स्त्री, पुरुषांसाठी स्वच्छतागृह नसल्याने रस्त्याच्या कडेला लघुशंका केल्या जातात. हा भाजी बाजार शहराच्या विकासापासुन कोसो दूर आहे.