
दैनिक चालू वार्ता उपसंपादक धाराशिव – नवनाथ यादव
धाराशिव/भूम:-ट्रॅक्टर चालवण्याचे कौशल्य शेतामध्येच नाही तर आता स्पर्धेच्या मैदानातही दाखवण्याची अनोखी संधी मिळणार आहे! युवानेते समाधान सातव यांच्या वाढदिवसानिमित्त पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने २० जुलै २०२५, सकाळी १० वाजता देवळाली येथे भव्य ट्रॅक्टर रिव्हर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत कुशल ट्रॅक्टर चालकांना आपले कौशल्य सादर करण्यासाठी खुलं व्यासपीठ मिळणार आहे. या उपक्रमास माजी मंत्री आ.प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांचे शुभेच्छा लाभल्या असून, कार्यक्रमाला मा.जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. युवा नेते सागर खराडे व सामाजिक कार्यकर्ते युवराज (काका) तांबे यांचेही विशेष मार्गदर्शन लाभले आहे.
स्पर्धेसाठी खालीलप्रमाणे आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत:प्रथम क्रमांक ७००० रुपये व ट्रॉफी,द्वितीय क्रमांक ५००० रुपये व ट्रॉफी,तृतीय क्रमांक ३००० रुपये व ट्रॉफी,तर चतुर्थ व पंचम क्रमांकासाठी आकर्षक ट्रॉफी ठेवण्यात आली आहे. स्पर्धेसाठी नोंदणी व काही नियम अटी असून,अंतिम नोंदणी १९ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत स्वीकारली जाणार आहे. स्पर्धकांनी स्वतःचे ट्रॅक्टर व चालकासह उपस्थित राहावे. वाहनाचे सर्व कागदपत्रे आणि वैध परवाना (लायसन्स) अनिवार्य आहे.
स्पर्धेतील विजेते वेळेच्या आधारे आणि नियमांनुसार पंचांच्या निर्णयावर ठरणार आहेत. ट्रॅक्टरप्रेमी, शेतकरी व युवकांसाठी ही स्पर्धा विशेष आकर्षण ठरणार आहे. त्यामुळे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.