
गडकरींकडून पुराव्यांसह पोलखोल;मुख्यमंत्र्यांनी थेट केली मोदींकडे तक्रार…
कर्नाटक काँग्रेसमध्ये आधीच मुख्यमंत्रिपदावरून घमासान सुरू आहे. त्यातच आता पुन्हा एकदा राज्य सरकार आणि मोदी सरकार आमनेसामने उभे ठाकले आहे. एका प्रकल्पाच्या उद्घाटनावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री सिध्दरामय्या आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यातील हा वाद थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहचला आहे.
कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यात नितीन गडकरी यांच्या हस्ते सोमवारी सिगंदूर या केबल पुलाचे लोकार्पण करण्यात आले. हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लांब केबल पूल ठरला आहे. या कार्यक्रमावेळी प्रोटोकॉल पाळण्यात आला नाही, असा आरोप सिध्दरामय्या यांनी केला आहे. कार्यक्रमासाठी आपल्या कार्यालयाशी कोणत्याही समन्वय साधण्यात आला नाही, असे त्यांनी म्हटले होते.
सिध्दरामय्या यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर नितीन गडकरी यांनी सोमवारीच सोशल मीडियात सिध्दरामय्या यांना पाठवलेली दोन पत्रे पोस्ट केली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना 11 जुलैला अधिकृत निमंत्रण पाठविण्यात आले होते. त्यानंतर 12 जुलैलाही त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात उपस्थित राहण्याची विनंती केली होती. कर्नाटक सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सहकार्याचे कौतुक आहे. आम्हीही राज्य सरकारांच्या सहकार्यासाठी कटिबध्द आहोत, असेही गडकरींनी सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
त्यानंतरही सिध्दरामय्या यांनी याबाबत थेट पंतप्रधानांकडे पत्राद्वारे तक्रारे केली आहे. त्यांनी सोशल मीडियात हे पत्र पोस्ट केले आहे. यामध्ये त्यांनी नितीन गडकरी यांच्या विभागाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. इतर माध्यमातून मला या कार्यक्रमाची माहिती मिळाली. पण माझ्या नियोजित कार्यक्रमामुळे मी नितीन गडकरी यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधत कार्यक्रम पुढे ढकलण्याची विनंती केली. त्यांनी ती मान्यही केली होती, असे सिध्दरामय्या यांनी म्हटले आहे.
अद्याप काम अपूर्ण असल्याने उद्घाटनाची घाई नव्हती. पण सरकारच्या कोणत्याही समन्वयाशिवाय कार्यक्रम घेण्यात आला. तसेच माजी मुख्यमंत्र्यांचे नाव उपमुख्यमंत्र्यांच्या आधी लिहिण्यात आले होते, असे तक्रार सिध्दरामय्या यांनी केली आहे. त्याआधी पत्रकार परिषदेतही त्यांनी भाजपच्या नेत्यांनी गडकरींवर दबाव टाकल्याचे दिसते, असे विधान केले होते. मला माहिती न देताच उद्घाटन करण्यात आल्याचा दावा सिध्दरामय्या यांनी केला होता.