
हिंदी सक्तीवरुन सध्या राज्यातील राजकारण तापले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय घेऊन मराठीबद्दलचा त्यांचा द्वेष दाखवून दिला, असा आरोप विरोधकांकडून होत आहे.
यावरुन मुख्यमंत्री फडणवीसांनी हिंदी सक्तीचा विषय आमच्या सरकारचा नाही तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंनी घेतलेला निर्णय आहे. त्यासंबंधीचा शासकीय अध्यादेश (जीआर) फक्त आम्ही काढला असे सांगत हिंदी सक्तीची पाटी उद्धव ठाकरेंच्या गळ्यात टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची गुरुवारी 20 मिनिटे भेट झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तूळात चर्चेला उधाण आले. देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना, ‘तुम्हाला सत्तेत येण्याचा अजूनही स्कोप आहे, वेगळा विचार करता येईल,’ असे दोन दिवसांपूर्वीच म्हटले होते. त्यानंतर दोन्ही नेत्यांची विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या दालनात गुरुवारी दुपारी भेट आणि चर्चा झाली. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. याभेटीतील चर्चेची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हिंदी सक्तीचा निर्णय हा आमचा नाही तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कॅबिनेटने घेतलेला आहे. पहिली ते 12 वी पर्यंत हिंदी सक्ती करावी, असा अहवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आला होता. या समितीमध्ये शिवसेनेचे (एकत्रित) उपनेते होते. तो अहवाल कॅबिनेटने स्वीकारला. एक आठवड्यानंतर कॅबिनेटचे मिनिट्स आले, तेही त्यांनी स्वीकारले. त्यावर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंची स्वाक्षरी आहे. हिंदी सक्तीचा निर्णय त्यांच्या कॅबिनेटने घेतला. त्याचा जीआर फक्त आम्ही काढला आणि हिंदी सक्ती आम्ही करत असल्याचा गवगवा केला जाऊ लागला, असा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी केला.
उद्धव ठाकरेंनी काल मला ‘हिंदीची सक्ती कशाला?’ हे वृत्तपत्र लेखांचा संग्रह असलेले पुस्तक भेट दिले, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, त्या पुस्तकामध्ये उद्धव ठाकरेंनी अहवाल स्वीकारला होता त्याचीही बातमी लावायला पाहिजे. त्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळानेही त्याचा स्वीकार केला, त्याचेही वृत्तपत्रातील कात्रणांचा संग्रह त्या पुस्तकामध्ये वाढवावा लागेल.
मुख्यमंत्री म्हणाले उद्धव ठाकरेंची आणि माझी भेट झाली तेव्हा लगेच बातम्या येतात. कोणी कोणाला भेटलं म्हणजे भाजपमध्ये येणार या बातम्या करणं योग्य नाही.