
टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. आतापर्यंत तीन कसोटी सामने झालेत. त्यात दोन कसोटी सामने इंग्लंडने तर एक भारताने जिंकला आहे. या टेस्ट सीरीजमध्ये जसप्रीत बुमराह टीम इंडियाकडून आतापर्यंत दोन कसोटी सामने खेळला आहे.
जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा हुकूमी एक्का आहे. मोक्याच्या क्षणी टीमला विकेट काढून देणं ही त्याची खासियत आहे. वर्कलोडचा बॅलन्स ठेवण्यासाठी जसप्रीत बुमराह या टेस्ट सीरीजमध्ये फक्त तीन कसोटी सामने खेळेल असं चीफ सिलेक्टर अजित आगरकर आणि हेड कोच गौतम गंभीर यांनी टेस्ट सीरीज सुरु होण्याआधीच सांगितलं होतं. त्यांचा हा निर्णय टीम इंडियाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांना पटलेला नाही. त्यांनी जसप्रीत बुमराह आणि हेड कोच गौतम गंभीरबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
“सर्वात जास्त महत्त्वाच आहे टीम इंडियासाठी खेळणं. जर तुम्ही फिट नाही, तर अजिबात खेळू नका. पहिल्या टेस्ट मॅचनंतर 7 ते 8 दिवसांचा आराम मिळाला होता. पण त्यानंतर जसप्रीत बुमराहचा दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश झाला नाही. हे योग्य नाही” असं दिलीप वेंगसरकर यांनी म्हटलं आहे. “माझ्या मते तुम्ही उपलब्ध असाल, फिट असाल, तर तुम्ही तुमच्या देशासाठी खेळलं पाहिजे. बुमराह वर्ल्ड क्लास गोलंदाज आहे. तो टीम इंडियाला जिंकवून देऊ शकतो. तुम्ही दौऱ्यावर असताना प्रत्येक सामना खेळणं आवश्यक आहे असं दिलीप वेंगसरकर रेवस्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
पहिल्या टेस्ट मॅचमध्ये शानदार गोलंदाजी
जसप्रीत बुमराहने लीड्स येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये शानदार गोलंदाजी केली होती. पहिल्या इनिंगमध्ये त्याने 5 विकेट काढले. त्यानंतर एजबेस्टनच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये त्याला विश्रांती दिली. पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडने विजय मिळवला. दुसऱ्यामध्ये बुमराहच्या अनुपस्थितीत टीम इंडिया जिंकली. तिसऱ्या लॉर्ड्स टेस्टमध्ये इंग्लंडने विजय मिळवला.
या सीरीजमध्ये बुमराहने किती विकेट काढलेत?
या टेस्ट सीरीजमध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने दोन टेस्टमध्ये 12 विकेट घेतल्या आहेत. लॉर्ड्स टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये पाच विकेट काढले आहेत. दुसऱ्या इनिंगमध्ये दोन विकेट काढले.