
अजित पवार गटाची पहिल्यांदाच मोठी कबुली !
आम्ही जेव्हा भाजपसोबत गेलो तेव्हा त्यांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली होती, असं म्हणत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी फुटीबाबत मोठे विधान केले आहे.
त्याचबरोबर आता पुन्हा राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा झाली तर आम्ही भाजपशी चर्चा करु, असा खुलासाही त्यांनी केला. पुण्यामध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
काय म्हणालेत सुनील तटकरे?
“दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा कोठेही झालेली नाही. तशी चर्चा सुरू नाही. आम्ही आता एनडीएमध्ये आहोत आणि ठराव घेतलाय इथेच राहणार आहे. आमचा एनडीए मध्ये सहभागी राहणे ही अधोरेखित आहे. आज काहीही विषय नाही. मात्र तसा काही विषय झाला तर भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा करू,” असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी स्पष्ट केले आहे.
त्याचबरोबर “आम्ही जेव्हा भाजपसोबत गेलो तेव्हा त्यांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली होती, असा सर्वात मोठा खुलासाही सुनील तटकरे यांनी केला आहे. आता जर शरद पवार यांच्यासोबत किंवा विलिनीकरणाचा विषय निघाला तर भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा करू, कारण ज्यावेळेस आम्ही वेगळा मार्ग घेतला होता तेंव्हा त्यांना विचारून निर्णय घेतला होता, असंही सुनील तटकरे म्हणालेत.
दरम्यान, लोकसभेत आमचा पराभव झाला. मात्र त्यानंतर लाडक्या बहीण योजनेसह विविध योजनाच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यात यशस्वी झालो, आणि महायुतीला विधानसभेत अभूतपूर्व यश मिळाले. निवडणूक आयोगाने आमचाच पक्ष मान्य केला आणि जनतेनेही कौल दिला,असेही सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.