
सामना च्या मुलाखतीनंतर भाजपच्या मुनगंटीवारांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं !
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीतून निवडणूक आयोगावर जोरदार टीकास्त्र डागलं. निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला धोंड्या आहे, अशा शब्दात त्यांनी आयोगावर टीका केली.
त्यांच्या याच वक्तव्यावर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. पराभवाचे चटके बसतात तेव्हा सर्व ठिकाणी शेंदूर लावलेलेच दिसतात, असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला. शिवाय यावेळी त्यांनी ठाकरे ब्रँड आता बाजारात चालत नसल्याचंही म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
सामनाच्या मुलाखतीत संजय राऊत यांनी, अमित शाह आणि निवडणूक आयोगाने शिवसेना दुसऱ्यांच्या हातात दिली असून आता ती भाजपमध्ये विलीन करू शकतात का? शिवाय शिवसेनेचं अस्तित्व संपवण्याचा हा प्रयत्न आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला.
त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, ते शिवसेना संपवू शकत नाहीत. इतकी वर्षे होऊनही ते जनतेला माझ्यापासून तोडू शकत नाहीत. त्यामुळे घालीन लोटांगण वंदीन चरण करायचं आणि मालकांच्या पक्षात विलीन व्हायचं हा शेवटचा पर्याय त्यांच्यापुढं आहे, असा टोला त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला.
तर निवडणूक आयोग कदाचित आमचं निवडणूक चिन्ह दुसऱ्याला देऊ शकतो किंवा गोठवू शकतो, पण ‘शिवसेना’ हे नाव ते दुसऱ्याला देऊ शकत नाहीत. त्यांना तो अधिकारच नाही. कारण हे नाव माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी दिलं आहे. उद्या मी निवडणूक आयुक्ताचे नाव बदलून धोंड्या ठेवले तर चालेल का?
या धोंड्याला पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही. लोकशाही पद्धतीमध्ये आम्ही वेडंवाकडं वागलो असू तर गोष्ट वेगळी, पण संविधानानुसार आम्ही काही चूक केली नसेल तर ते आमचं चिन्हही काढू शकत नाहीत. मतांची टक्केवारी वगैरे जे काही असेल ते चिन्हापुरतं आहे. नाव दुसऱ्याला देऊ शकतच नाहीत, असं परखड मत ठाकरेंनी यावेळी व्यक्त केलं.
शिवाय यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाने जे केलं ते बेकायदेशीर केल्याचा आरोप केला. ‘शिवसेना’ हे नाव त्याला दुसऱ्याला देता येत नाही. ते त्यांच्या अधिकाराच्या बाहेरचं आहे, पण त्या धोंड्याला शेंदूर फासणारे दिल्लीत बसल्याने सध्या चालून जातंय, असं म्हणत त्यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. पण लोक कोणत्याही धोंड्याचं ऐकणार नाहीत. शेवटी चोरीचा माल आहे. चोरून मतं मिळवली असली तरी चोर तो चोरच असतो असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
ठाकरे ब्रँड बाजारात चालत नाही
त्यांच्या याच टीकेला सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, जेव्हा पराभवावर पराभव होतात आणि पराभवाचे चटके बसतात तेव्हा आपल्याला सर्व ठिकाणी शेंदूर लावलेले दिसतात. आता ठाकरे ब्रँड बाजारात चालत नाही. बाजारात अनेक ब्रँड आहेत पण प्रत्येक ब्रँड चालतोच असं नाही.
त्याचप्रमाणे सध्या ठाकरे ब्रँड ग्राहकांना मतदारांना पसंत येत नाही, असं टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. तर सर्वसामान्य जनता देखील आमच्यासोबतच आहे. ईव्हीएमची बटणं दाबून त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की आम्ही तुमच्यासोबत आहोत, असंही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.