
मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी कोणाची माय व्यायली बघूच; उद्धव ठाकरेंचा थेट इशारा…
आमच्या एकत्र येण्यामुळे केवळ मराठी माणसांनाच नाही, तर इतर भाषिकांनासुद्धा आनंद झाला. अगदी मुसलमान बांधवांनादेखील आनंद झाला. ते जाहीरपणाने आनंद व्यक्त करतायत.
गुजराती आणि हिंदी वगैरे इतर भाषिकसुद्धा म्हणाले, ‘अच्छा किया आपने’. त्यांना झालेला हा आनंद मी बघतो. पण कोणाला पोटशूळ झालाच असेल तर तो पोटशूळ त्याच्याकडे. त्याकडे मी दुर्लक्ष करतो. आता मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी कोणाची माय व्यायली आहे बघूच, असा थेट इशारा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.
आम्ही दोघे मिळून महाराष्ट्राचे स्वप्न साकार करू
उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली आहे. खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीत ठाकरे म्हणाले, “मराठी माणसांची एकजूट अभेद्य आहे. हिंदी सक्तीच्या निमित्ताने भाजप महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न करत आहे, पण तसे घडणार नाही. आम्ही कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही, पण कोणत्याही भाषेची सक्ती मराठी माणूस सहन करणार नाही,” असे ते म्हणाले. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील काय? दोघांची राजकीय युती होईल काय? हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या धुमाकूळ घालत आहे. यावर ठाकरे म्हणाले, ”आम्ही दोघे भाऊ एकत्र आल्याने कुणाला काही प्रॉब्लेम आहे काय? त्यांच्या पोटदुख्या त्यांनी सांभाळाव्यात. आम्ही दोघे मिळून महाराष्ट्राचे स्वप्न साकार करू. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ.
आम्ही हिंदीचा द्वेष करत नाही, पण…
“मराठी माणसांचं एक वैशिष्ट्य आहे, मराठी माणूस हा आततायीपणा करणारा नाही. मराठी माणूस हा विघ्नसंतोषी नाही. मराठी माणूस हा इतर वेळेला मी बरं आणि माझं काम बरं असा असतो. कोणावरही अन्याय करत नाही. हाच मराठी माणूस जर त्याच्यावर अन्याय झाला तर सहनही करत नाही. आता सहनशीलतेचा कडेलोट व्हायला लागला म्हणूनच मराठी माणूस पिसाळलाय, जसा संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या वेळेला तो पेटला होता. तसाच तो आता पेटलेला आहे. कारण किती काळ हे सहन करायचं? आमची चूक काय असं त्याला वाटू लागलंय,” असे ठाकरे म्हणाले.
“शिवसेनाप्रमुखही तेच सांगायचे, माझे आजोबाही तेच सांगायचे. जितक्या भाषा तुम्हाला शिकायच्या आहेत तितक्या भाषा तुम्ही शिका. पण कुणावरही जबरदस्ती करू नका. तुम्ही स्वतः राज्यसभेत हिंदीत बोलता. मीडियासमोर असताना जर मला हिंदीत विचारलं, तर मी हिंदीत उत्तर देतो. आम्ही हिंदीचा द्वेष करत नाही, पण हिंदीची सक्ती नकोच. तुम्ही वन नेशन-वन इलेक्शन, सगळंच वन…वन…वन… वन… करत चाललेला आहात. आपला देश हा संघ राज्यपद्धत आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.
महाराष्ट्र विरुद्ध इतर राज्यं असा संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र विरुद्ध इतर राज्यं असा संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न भाजप करतोय. पण तो पेटत नाहीये. याचं कारण, आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही. जसं आम्ही इतरत्र मराठी लादण्याचा आग्रह करत नाही तसं आमच्यावर दुसरी भाषा लादण्याचा आग्रह धरू नका, असा इशारा ठाकरे यांनी दिला.