
उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सल्ला !
सहकारी मंत्र्यांची भांडणं, लफडी बाहेर येताहेत, ती त्यांनी मोडीत काढली पाहिजेत. हे मी त्यांना आमचे कधीकाळीचे राजकीय मित्र म्हणून सांगतोय, असा सल्ला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.
खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची सामनासाठी मुलाखत घेतली. यावेळी ठाकरे म्हणाले की, ”मराठी माणसांची एकजूट अभेद्य आहे. हिंदी सक्तीच्या निमित्ताने भाजप महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न करत आहे, पण तसे घडणार नाही. आम्ही कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही, पण कोणत्याही भाषेची सक्ती मराठी माणूस सहन करणार नाही.” उद्धव ठाकरे यांनी पहलगाम अतिरेकी हल्ल्याबद्दल मोदी सरकारला ‘जाब’ विचारला, ”26 भगिनींचे कुंकू पुसले व अतिरेकी गायब झाले. हे सरकारचे अपयश आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ कोणाच्या दबावाखाली मागे घेतले ते देशाला सांगा.
मुंबई महापालिका निवडणुकीत मविआ सोबत असेल का?
मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी सोबत असेल का? यावर बोलताना ठाकरे म्हणाले, मुंबई महापालिका निवडणूक ही जिंकण्याच्या उद्देशानेच लढणार आहोत. महाविकास आघाडी असेल का? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मध्यंतरी काँग्रेसशी बोलणं झालं. तर त्यांचं म्हणणं आहे की, कदाचित ते स्थानिक पातळीवर निर्णय घेतील. ठीक आहे. तसं असेल तर तसं करू, असे उद्धव ठाकरे म्हणाले. “मी मुंबई महाराष्ट्रापासून राजकीयदृष्ट्याही कदापिसुद्धा वेगळी समजत नाही. कारण मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. त्यामुळे मुंबईचा वेगळा आणि महाराष्ट्राचा वेगळा विचार करून चालणार नाही. राज्य म्हणून प्रत्येक महापालिकेची स्वायत्तता आहे. तिथे प्रत्येक ठिकाणी जसं शिवसेनेचं युनिट आहे तसं इतर पक्षांचंही आहे. त्यांना राजकीयदृष्ट्या जे योग्य वाटत असेल तसेच करू. लढायचं तर नक्कीच आहे. मुंबई महापालिकेवर शिवसेना आणि मराठी माणसाचा भगवा झेंडा पुन्हा एकदा फडकणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज ठाकरे यांच्याशी थेट चर्चा होणार का?
मुंबईच्या, मराठी माणसाच्या लढ्याच्या सगळ्या घडामोडींमध्ये आणि येणाऱ्या महापालिकेसंदर्भात राज ठाकरे यांच्याशी थेट चर्चा करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. “मी जर थेट चर्चा केली तर कुणाला काय अडचण आहे? मी आतासुद्धा फोन उचलून त्याला फोन करू शकतो. तो मला फोन करू शकतो, आम्ही आता भेटू शकतो. अडचण काय आहे? बाकीचे लोक एकमेकांना चोरूनमारून भेटतात. आम्ही चोरूनमारून भेटणाऱ्यातले नाहीत. मुलाखतीच्या सुरुवातीलाच बोललात ना की ‘ठाकरे ब्रॅण्ड’ वेगळा आहे. ठाकरे काही चोरूनमारून करत नाहीत. भेटायचं असेल तर उघडपणे भेटू. याची अडचण काय कुणाला? असा सवाल ठाकरेंनी केला.