
ऑपरेशन सिंदूर; ट्रम्प यांचा दावा संसदेत गाजणार…
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात १० ते ११ विधेयक मांडली जाणार आहे. ऑपरेशन सिंदूरवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे.
सरकारकडूनही या विषयावर चर्चेची तयारी दर्शवण्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेसकडून पहलगाम हल्ल्याबाबत लोकसभा आणि राज्यसभेत स्थगन प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. रविवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत सरकारने सांगितले की, संसदेच्या अधिवेशनात विरोधकांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास आणि योग्य उत्तरे देण्यास सरकार तयार आहे.
पहलगाम हल्ल्यावर चर्चेची मागणी करणार
लोकसभेत काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी तर राज्यसभेत काँग्रेस खासदार रणदीप सुरजेवाला आणि रेणुका चौधरी यांनी स्थगन प्रस्ताव दिला आहे. संसदेचे सर्व कामकाज बाजूला ठेवून पहलगाम हल्ल्यावर सरकारने निवेदन द्यावे, अशी मागणी काँग्रेसच्या खासदारांनी केली आहे. तसेच या मुद्द्यावर लोकसभेत चर्चा करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारत-पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधीसाठी आपण मध्यस्थती केल्याचा दावा केला होता. त्यावरही विरोधक सरकारला घेणार आहे. आयकर विधेयकावर स्थापन केलेली समिती लोकसभेत आपला अहवाल सादर करणार आहे. केंद्र सरकार या अधिवेशनात हे विधेयक संसदेत मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीत झाली सरकारला घेरण्याची रणनीती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या घटनेची माहिती सभागृहाला द्यावी, यावर विरोधक आक्रमक आहेत. अधिवेशनापूर्वी इंडिया आघाडीची शनिवारी बैठक झाली होती. या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर थांबवणे, भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षात मध्यस्थी करण्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, बिहारमधील मतदार याद्या यावर सरकारला घेण्याचा निर्णय झाला होता.
महाराष्ट्रातील हिंदी सक्तीचा मुद्दा अधिवेशनात गाजणार आहे. महाराष्ट्रातील विरोधी खासदार या विषयावर केंद्राकडून भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करणार आहे. हिंदी बाबत केंद्र सरकारने धोरण स्पष्ट करावे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार करणार आहेत. दरम्यान अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संसद भवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.