
खडसेंनी अखेर ‘तो’ खळबळ उडवून देणारा व्हिडिओ समोर आणलाच; महाजनांना धक्का ?
महाराष्ट्रात सध्या हनी ट्रॅपचे प्रकरणामुळे धाबे दणाणले आहे. या हनी ट्रॅपमध्ये आजी-माजी मंत्री यांसह 72 हून वरिष्ठ अधिकारी अडकल्याची खळबळ उडवून देणारी माहिती समोर येत आहे.
या प्रकरणात पोलिसांनी भाजपचे नेते गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून आरोप होत असलेल्या प्रफुल्ल लोढा यांना अटक केली आहे.
याचदरम्यान, माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी खळबळजनक दावा केला आहे. प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीला हनी ट्रॅपबद्दल सगळे माहिती आहे, असं त्यांनी म्हटलं. तसेच या प्रकरणीच एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी(ता.21) खळबळजनक दावा करतानाच एक जुना व्हिडिओही समोर आणला आहे. हा व्हिडिओ पोलिसांनी हनी ट्रॅप प्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रफुल्ल लोढाचा आहे. या व्हिडिओत लोढानं गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आज वृत्तपत्रात पुरावे असतील तर पोलिसांना द्यावे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच पण मला पुरावे पोलिसांना देण्याची आवश्यकता नाही. कारण मला फक्त बटण दाबायचं काम असल्याचं खळबळजनक विधान करताना दिसून येत आहे.
तसेच व्हिडिओत लोढा म्हणाला, पण मी एक मनुष्य आहे. मी कुणाला वहिनी म्हटलं आहे, कुणाला आई म्हटलं आहे, कुणाला मुलगी म्हटलं आहे, मर्यादा पाळून मी अजून चूप आहे. पण ज्यादिवशी आपले 100 पाप पूर्ण होतील, त्या दिवशी मला आपल्या सल्ल्याची गरज लागणार नसल्याचा दावाही त्यानं खडसेंनी बाहेर काढलेल्या व्हिडिओत म्हटलं आहे.
प्रफुल्ल लोढा यानं जिवाला धोका असल्याचंही व्हिडिओत नमूद केलं आहे. तो म्हणाला, माझ्या स्वत:च्या संरक्षणासाठी 2 तारखेला जामनेर पोलीस स्टेशन आणि एसपी ऑफिस, मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे. कारण जामनेर तालुक्यातील ही जी विकृती आहे, त्यांचे बरेच पुरावे माझ्याकडे आहेत. त्यामुळे माझ्या जिवाला धोका आहे,असंही त्यानं सांगितलं आहे.
आपल्याला 21 जुलै रोजी बालब्रह्मचारी म्हणवणारे रामेश्वर नाईक यांनी व्हाट्सअप कॉलवरुन जीवे मारण्याची धमकी दिली, हा त्याचा पुरावा असल्याचा खळबळ उडवून देणारा दावाही प्रफुल्ल लोढा यांनी केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रफुल्ल लोढा म्हणून आमच्या जळगावातील जामनेरचा आहे. भाजपचा कार्यकर्ता आहे, गिरीश महाजनचा कार्यकर्ता आहे. त्याच्यावर देखील एक गुन्हा दाखल झाला असल्याचं म्हटलं आहे.
तसेच प्रफुल्ल लोढानं गेल्या वर्षी गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करु शकणार नाहीत, त्यामुळे एसआयटी स्थापन करावी, अशी मागणीही खडसे यांनी केली आहे.
विधान परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी प्रफुल लोढावर दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आणली आहे. त्यात त्यांनी साकीनाका आणि अंधेरी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आले असून दोन वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याचं म्हटलं आहे.
दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणं, छळणं, फोटो काढणं, ब्लॅकमेलिंग करणं हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरा गुन्हा हनीट्रॅपच्या संदर्भात अल्पवयीन मुलींना अमिष दाखवणं, फोटो काढणं यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्याचा गौप्यस्फोटही खडसेंनी केला आहे.