
रमी जाहिरातीच्या पॉप-अपसाठी !
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचा पावसाळी अधिवेशनाचे सभागृह सुरू असताना रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल केल्यानंतर खळबळ उडाली आहे.
यानंतर विरोधक आक्रमक झाले असून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करताना दिसत आहेत. याचपार्श्वभूमीवर आज (22 जुलै) पत्रकार परिषदेत घेत माणिकराव कोकाटे यांनी माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचण्याची भाषा केली आहे. त्यामुळे आता विरोधक पु्न्हा एकदा आक्रमक झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते अंबादास दानवे यांनी कोकाटे यांच्यावर पलटवार केला आहे.
अंबादास दानवे म्हणाले की, कृषीमंत्री यांनी कबुल केलं पाहिजे की, ते रमी खेळत होते. तसेच रमी खेळताना डोकं खाजवत होते. कारण रमी जाहिरातीच्या पाॅपअपसाठी डोकं खाजवायला लागतं का? असा प्रश्न उपस्थित करत दानवे म्हणाले की, तुम्ही राज्याचे कृषिमंत्री आहात. परंतु तुमच्यामुळे आज मुख्यमंत्री हतबल झाले आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोकाटेंचा राजीनामा घेऊन तो महाराष्ट्राला गिफ्ट करावा. नाहीतर सरकारने रमीला राजमान्यता द्यावी आणि तसा अध्यादेश काढावा. त्यानंतर त्यांनी (माणिकराव कोकाटे) बिनधास्त रमी खेळावी किंवा बिनधास्तपणे कोर्टात जावे. परंतु राज्याचा कृषीमंत्रीच एवढा असंवेदनशील असेल तर शेतकऱ्यांचा वाली कोण? कारण इतर राज्यात रमीवर बंदी असेल तर आपल्याकडेही अशी बंदी केली पाहिजे. आज महाराष्ट्राच्या अब्रुची लक्तरे वेशीला टांगली गेली आहेत. सरकारचा एकही मंत्री समाधानकारक काम करू शकत नाही. तुम्ही (माणिकराव कोकाटे) रमी खेळत होते की नव्हते हा मुद्दा नाही. पण झुम करून पाहिले तर कळेल की, ते (माणिकराव कोकाटे) कोणते पत्ते खेळत होते, असे म्हणत अंबादास दानवे यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा साधला.
पत्रकार परिषदेत माणिकराव कोकाटे म्हणाले की, मी आधीच खुलासा केला आहे की, मला रमी खेळता येत नाही. तसेच मी कधीही ऑनलाइन रमी खेळलेलो नाही. रमी खेळण्यासाठी मोबाइल क्रमांक आणि बँक खाते लिंक करावे लागते आणि माझ्या कोणत्याही अकाऊंटसोबत रमीचे अॅप जोडलेले नाही. तरीही मी माझी बँक खाती तपासणीसाठी तयार आहे. चौकशी करा आणि आरोप करताना तथ्य तपासा. नाहीतर ज्यांनी माझी बदनामी केली, त्यांच्यावर मी अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे. कारण एका 15 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये मी रमी खेळत असल्याचे भासवले जात आहे. परंतु मी लक्ष्यवेधी प्रश्नांसाठी माहिती घेत होतो. पण मोबाइल उघडल्यावर काही सेकंदांचा गेम स्किप होणारा व्हिडीओ आला. मोबाइल नवीन होता. म्हणून मला गेम स्कीप करायला वेळ लागला. तो गेम मी खेळलेला नाही. आरोप करणाऱ्यांनी संपूर्ण व्हिडीओ का दाखवला नाही? लोकांच्या समोर संपूर्ण सत्य यावे, असे स्पष्टीकरण माणिकराव कोकाटे यांनी दिले.