
सातारा शहरातील तहसील कार्यालयासमोर एकाला मारहाण करण्यासाठी आलेल्या टोळक्याचा वाहतूक महिला पोलिस व सातारा शहर पोलिसांमुळे डाव उधळला गेला. यावेळी भर रस्त्यावर तांगडा-तांगडी व संशयित आरोपींनी वाहनांची रेटारेटी केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, पोलिसांनी कोयता, कुकरी यासारखी धारदार हत्यारे जप्त केली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, वाहतूक महिला पोलिस अर्चना मोहिते व वैशाली लोखंडे हे शुक्रवारी पोवई नाका येथे कर्तव्य बजावत होते. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास तहसिल कार्यालयासमोर युवकांचा मोठा जमाव जमला असून अनर्थ होणार असल्याची माहिती महिला पोलिसांना मिळाली. या दोन्ही महिला पोलिसांनी क्षणाचा विलंब न करता दुचाकीवरुन तहसिल कार्यालय परिसर गाठले.
यावेळी तेथे काही युवक संशयास्पद हालचाली करताना आढळले. पोलिसांना पाहताच या संशयित आरोपींची पळापळ झाली. भर रस्त्यावर काही संशयित युवक वाहनांवरुन भरधाव तर काहीजण पळत जावू लागले. यावेळी माहिला पोलिसांनी मोठ्या शर्थीने संशयितांची धरपकड करण्यासाठी हालचाल केली. याचवेळी सातारा शहर पोलिसही दाखल झाले. त्यांनीही परिसरात हाणामारीसाठी आलेल्या संशयितांचा शोध सुरु केला. पोलिसांनी पकडापकडीला सुरुवात केल्याने संशयितांनी आणलेली शस्त्रे रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका कारमध्ये टाकली. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारमध्ये पाहणी केली. त्यांना कुकरी, कोयता या सारखी धारदार हत्यारे मिणाली. यानंतर पोलिसांनी काही जणांना पकडून हत्यारे ताब्यात घेतली.
संशयित आरोपींना पकडल्यानंतर त्यांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांनी प्राथमिक चौकशीला सुरुवात केली. रात्री उशीरापर्यंत पोलिसांची चौकशी सुरु होती. सर्व माहिती घेतल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.