
पुणे शहरातील उच्चभ्रू खराडी भागात सुरू असलेल्या एका रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी छापा टाकला.
ही पार्टी खराडीतील एका लॉजमध्ये असलेल्या खासगी फ्लॅटमध्ये सुरू होती. हाउस पार्टीच्या नावाखाली सुरू असलेल्या या पार्टीत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू आणि हुक्काचा वापर होत असल्याचे पोलिसांनी उघड केलं.
याच पार्टीत आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई प्रज्वल खेवलकर यांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. मात्र या सगळ्याच घडामोडींवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी अगदी तोलूनमापून उत्तर दिलं. कुणाचंही नाव न घेता प्राथमिकदृष्ट्या गुन्हा घडल्याचं दिसत आहे, असे सावध उत्तर त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलं.
मला याबाबत माध्यमांतूनच माहिती समजली आहे. या प्रकरणात पूर्ण ब्रिफींग अजून मी घेतलेलं नाही. पण माध्यमांत जे दिसलं त्यात पोलिसांनी एक रेव्ह पार्टी बस्ट केली आहे. त्यात काही ड्रग्स वगैरे सापडले आहेत. प्राथमिकदृष्ट्या अशा प्रकारचा गुन्हा त्या ठिकाणी घडलेला दिसतोय, अशा शब्दांत पुणे पोलिसांच्या रेव्ह पार्टीवरील कारवाईवर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी एकनाथ खडसेंच्या जावयाचं नाव घेतलं नाही.
उद्धवजींना आमच्याही शुभेच्छा फक्त..
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज मातोश्री येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याबाबत विचारले असता उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेले चांगली गोष्ट आहे यात राजकारण कशासाठी पहायचं आपण. आमच्याही उद्धवजींना शुभेच्छा आहेत सगळ्यांच्याच आहेत. जन्मदिनाच्या शुभेच्छा द्यायला गेले तर त्यात राजकारण पाहणं हे काही योग्य नाही असं मला वाटतं.
या शुभेच्छानंतर महाराष्ट्राच्या मनात असलेलं घडत आहे अशा चर्चा सुरू झाल्या आहेत यावर बोलताना फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला. महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसलं. आता महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दिसेल. आता काही पक्षांच्या नेत्यांच्या मनात काय आहे ते महाराष्ट्राच्या मनातलं आहे असं म्हणणं काही योग्य नाही. फार मोठं स्टेटमेंट होईल ते असे फडणवीस म्हणाले.
मंत्र्यांना अडचण असेल तर माझ्याशी बोला पण..
समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात वाद उफाळून आला आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन्ही मंत्र्यांचे कान टोचले. अशा प्रकारे पत्र लिहून वाद कुणीही तयार करू नये. मंत्र्यांनी आपापसात बोलावं. त्यांना काही अडचणी असतील तर त्यांनी मला येऊन सांगाव्यात म्हणजे त्या अडचणी आपल्याला दूर करता येतील.
मंत्री आणि राज्यमंत्री एकाच सरकारचे घटक आहेत. सगळे अधिकार मंत्र्यांकडे असतात. मंत्री जे अधिकार देतात ते राज्यमंत्र्यांचे अधिकार असतात. राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार नाही असे मानणेही योग्य नाही. राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण अशा प्रकारच्या बैठकांत काही धोरणात्मक निर्णय असतील तर ते निर्णय मंत्र्यांशी बोलल्याशिवाय घेता येत नाहीत. जर घेतले तर त्याला मंत्र्यांची मान्यता घ्यावी लागते. मंत्री आणि राज्यमंत्री दोघांनीही सामंजस्य दाखवायला पाहिजे. काही अडचण असेल तर माझ्याशी बोललं पाहिजे.