
प्रांजल खेवलकरांच्या वकिलांचा खळबळजनक आरोप; पुणे पोलिसांवर ५० कोटींचा दावा ठोकणार…
पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांनी एकूण सात जणांना अटक केली आहे. मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात पार पडली. न्यायालयाने पाच पुरुष आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी तर दोन महिला आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
आता या प्रकरणात डॉ. प्रांजल खेवलकर यांच्या विकलांनी केलेल्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
आरोपींकडून तपासात सहकार्य करण्यात येत नाही. एप्रिल आणि मे महिन्यातली त्याच हॉटेलमध्ये पार्टी झाली होती अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. यावर प्रांजल खेवलकरांच्या वकिलांनी पोलिसांवर खोटी माहिती देत बदनामी केल्याचा गंभीर आरोप केला असून, त्यामुळे पुणे पोलिसांवर ५० कोटींचा दावा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. वकिलांनी केलेल्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
विकलांचा दावा काय ?
पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात अटकेत असलेल्या डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यावर पोलिसांनी केलेली कारवाई बनावट आहे. ते त्यांना अडवण्याचा प्रयत्न करताहेत, असा आरोप वकिलांनी केला आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे खेवलकर यांच्या वकिलांनी सांगितले आहे. हे सगळं प्रकरण प्रांजल खेवलकर यांच्यावर ट्रॅप लावून केलं असल्याचा खळबळजनक दावाही वकील विजयसिंह ठोंबरे पाटील यांनी केला आहे.
ती महिला पोलिसांनीच पाठवली होती
रेव्ह पार्टी प्रकरणात दोन्ही महिलांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावणी आहे. ईशा देवज्योत सिंग, प्राची गोपाल शर्मा अशी या महिला आरोपींची नावे आहेत. पोलिस राहुल नावाच्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. संबंधित व्यक्ती ड्रग्स पेडलर असल्याची प्राथमिक माहिती असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे या पार्टीत ड्रग्सचा पुरवठा या व्यक्तीमार्फत झाला होता का? याचा तपास केला जात आहे.
मात्र, खेवलकरांच्या वकिलांनी पोलिसांवरच थेट आरोप करत ज्या महिलेच्या पर्समध्ये कोकेन सापडलं ती पोलिसांनीच पाठवली होती, असा खळबळजक आरोप केला आहे.
आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर
पार्टी प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांच्या संपर्कात काही दिवसांपर्वी श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणी हे दोघे आले. या दोघांचीही पार्श्वभुमी गुन्हेगारी असल्याची माहिती समोर आली आहे. श्रीपाद यादव याच्यावर या आधी बेटींग प्रकरणात गुन्हे दाखल असून त्याला अनेकदा अटकही झाली होती. तर निखिल पोपटाणी याचा सिगारेटचा व्यवसाय असून तो देखील बेटींगच्या दुनियेत बुकी या नावाने ओळखला जातो.