
पण खरी औकात कोणाची; हे सांगणारच – संजय कोकाटेंचा सावंतांवर पलटवार
शिवसेनेचे सोलापूर जिल्हासंपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर माढ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत संजय कोकाटे आणि महेश साठे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला होता.
त्यावर सावंतांनी ‘मी प्रतिक्रिया द्यावी, एवढे ते मोठे नाहीत,’ असे म्हटले होते, त्याला कोकाटेंनी सडेतोड उत्तर देत शिवाजी सावंतांचा संपूर्ण इतिहासच काढला आहे.
संजय कोकाटे (Sanjay Kokate) म्हणाले, माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झालेली भेट हे शिवाजी सावंतांच्या राजीनाम्यामागे कारण असावं, असं आम्हाला वाटलं होतं. राजीनामा पत्रातील कारणं पटण्यासारखी नव्हती, त्यामुळे आम्ही सावंतांच्या राजीनाम्यावर काही बोलणार नव्हतो. पण, माढ्यातील पत्रकार परिषदेत ते आमच्यावर बोलले म्हणून शिवाजी सावंतांना उत्तर देत आहे.
सावंत हे पैशाने मोठे असतील, पण त्या मोठेपणात शिवाजी सावंत यांचा किती सहभाग आहे, हा संशोधनाचा विषय आहे. राजकीयदृष्ट्या बोललं पाहिजे; म्हणून आज बोलत आहे. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत मला शिवसेनेचे तिकिट देण्यात शिवाजी सावंत (Shivaji Sawant) यांचा सिंहाचा वाटा होता. त्या उपकराचे ओझे म्हणून मी त्यांच्या अनेकवेळा पाया पडलो की, असं करू नका, तसं करू नका म्हणून.
पण, दुर्दैवाने त्यांना स्वतःच्या पुढे त्यांना काहीच माहिती नाही. आम्ही पक्षाकडे थेट जाणं, त्यांना पसंत नाही, त्यामुळे त्यांनी आमच्या विरोधात काम करायला सुरूवात केली. आम्ही जाहीरपणे त्याबाबत कधीही सांगितलं नाही, असेही कोकाटेंनी सुनावले.
विधानसभेच्या निवडणुकीत शिवाजी सावंत यांना पक्षाच्या चिन्हावर ४० हजार, तर मला ७० हजार मते मिळाली. तरीही ते म्हणणार की गाडीखाली चालणारं म्हणतंय मीच गाडी ओढतोय, अशी भाषा त्यांनी अनेक ठिकाणी वापरली. पक्षाने मला त्यांच्यावर बोलू नका, असे सांगितले आहे. पण माझं दुकान काय राजकारणावर चालत नाही. मला पक्षातून काढलं तरी चालेल. पण, खरी औकात कोणाची आहे, हे त्यांना सांगणार आहे, असेही आव्हान कोकाटेंनी सावंतांना दिले.
शिवाजी सावंत हे महेश साठेंवर बोलले. पण, त्यांच्यामुळेच आज पक्षात चार चांगली लोकं येत आहेत, ते तुमच्यापेक्षा वयाने, संपत्तीने छोटे असतील पण त्यांची नियत एकनाथ शिंदे आणि शिवसेनेसाठी चांगली आहे. आपण तीन वर्षे संपर्कप्रमुख आहात, आपले भाऊ मंत्री आहेत. पण तुम्ही सोलापूर, पंढरपूर आणि माढ्यातील शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर कधी शिवसेनेसाठी बैठक घेतली का, असा सवालही संजय कोकाटे यांनी सावंतांना विचारला.