
राज ठाकरेंनी एका वाक्यात लावला निकाल; म्हणाले…
महाराष्ट्र राज्य स्वत: गुजराती साहित्य संमेलन भरवत आहेत. भरू देत. व्यापाऱ्यांच्या चोपड्यांमधून, पुस्तकांच्या चोपड्यात लक्ष गेलं तर जास्ती बरं. पण हे काय चालू आहे. केवळ गुजराती माणसाबद्दलचं प्रेम नाही.
मराठी माणसाची आणि गुजराती माणसाची लागावी. त्यांची भांडणं व्हावी. त्यातून मतं कशी काढू शकतो, त्यासाठी काय काय करता येईल, यासाठीचे उद्योग आहेत” असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. ते रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते.
“त्यांना वाटलं राज ठाकरे, संजय राऊत आम्ही त्यावर लगेच रिअॅक्ट होऊ. होणार नाही. आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करू. तुम्हाला जे पाहिजे ते करणार नाही. बिलकूल करणार नाही. जेव्हा समजेल तुमच्या कृतीतून महाराष्ट्राला नख लागतंय तेव्हा अंगावरच येऊ. कान बंद ठेवू नका. डोळेबंद ठेवू नका, आजूबाजूला काय चाललंय त्याकडे लक्ष द्या” असं राज ठाकरेंनी आवाहन केलं.
…तेव्हा वेळ निघून गेलेली असेल
“तरुण आणि तरुणींनो लक्ष ठेवा. तुम्ही विकले जातात. तुमच्या पायाखालची जमीन निसटतेय. तुमची भाषा निघून जाईल. कालांतराने पश्चात्तापाचा हात कपाळाला लागेल. तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. पैसे कमावले पाहिजे,. कुटुंब उभं केलं पाहिजे. पण महाराष्ट्र विकून नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
…तेव्हा उरतात जिवंत प्रेतं
बाहेरच्या राज्यात आपल्याबद्दल काय बोलतात माहीत आहे का, ही विकत घेणारी माणसं असं बोललं जातं. ही आपली प्रतिमा आहे. सव्वाशे वर्ष हिंद प्रांतावर राज्य करणारा महाराष्ट्र आहे. तो विकला जातो. माणसं विकली जातात. आपली जमीन आणि भाषा सोडतो. कशाला पुतळे ठेवतो शिवाजी महाराजांचे? डेकोरेशन म्हणून, फारसी शब्द असू नये म्हणून स्वताचा राजकोष काढणारा माणूस, ज्याने मराठीत बोलायला सांगितलं. त्या महाराष्ट्रात आम्ही स्वाभिमान आणि स्वत्व घालवत आहोत. जेव्हा स्वाभिमान विकला जातो, तेव्हा उरतात जिवंत प्रेतं. महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारा आहे. त्यामुळे तुम्ही जिवंत असलं पाहिजे. तुम्ही मोठं झालं पाहिजे. पण महाराष्ट्र विकून होता कामा नये. कुणाच्या आहारी जाऊ नका असं राज ठाकरे म्हणाले.