
रक्षा खडसे यांची 6 दिवसानंतर प्रांजल खेवलकर प्रकरणावर प्रतिक्रिया काय ?
पुण्यातील रेव्ह पार्टीनंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडालीये. खराडी भागात पुणे पोलिसांनी एका पार्टीवर छापेमारी केली. पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टी करताना एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकरला रंगेहात पकडले आणि राजकीय भूकंप आला.
आजच रोहिणी खडसे यांनी रेव्ह पार्टी प्रकरणात शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी या प्रकरणाची माहिती त्यांनी दिली. दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी या प्रकरणी पुणे पोलिसांच्या विरोधात थेट कोर्टात जाणार असल्याचे स्पष्ट केलंय.
एकनाथ खडसे यांच्या सूनबाई आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी या प्रकरणावर आता पहिल्यांदाच भाष्य केलंय. त्यांनी पुण्यातील रेव्ह पार्टीवर प्रतिक्रिया दिली आहे. रक्षा खडसे या प्रकरणी बोलताना म्हणाल्या की, या सर्व गोष्टी आता न्यायालयात गेलेल्या आहेत, पोलीस सुद्धा त्याची चौकशी करत आहे, जी सत्यता आहे ती पुढे येईल. या प्रकरणाच्या माध्यमातून एकनाथ खडसे यांना टार्गेट केलं जात असल्याच्या प्रश्नावर देखील त्यांनी उत्तर दिलंय.
रक्षा खडसे म्हणाल्या की, मी सुद्धा आज केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदार पदावर आहे, त्यामुळे कोणत्याही गोष्टीची सत्यता पुढे येत नाही, तोपर्यंत मला नाही वाटत की मी त्यावर प्रतिक्रिया दिली पाहिजे. मागील काही दिवसांपासून रक्षा खडसे या पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात काय भूमिका घेणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या, शेवटी रक्षा खडसे यांनी थेट भाष्य केले आहे. रक्षा खडसे या भाजपाच्या केंद्रीय मंत्री आहेत.
रक्षा खडसे यांच्या ननंदबाई रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर न्यायालयीन कोठडीत आहेत. प्रांजल खेवलकरचा जामिनाचा अर्ज कोर्टामध्ये लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे. प्रांजल खेवलकरच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह चॅट आणि काही व्हिडीओ सापडल्याची माहिती न्यायालयात पोलिसांनी दिली आहे. मात्र, प्रांजल खेवलकर याने पत्नी रोहिणी खडसेला पार्टीमधील मुलींसोबत आपला काहीही संबंध नसल्याची माहिती सांगितली आहे. न्यायालयात काय गोष्टी घडल्या हे मी तुम्हाला जास्त सांगू शकत नसल्याचेही रोहिणी खडसे यांनी शरद पवारांच्या भेटीनंतर माध्यमांना बोलताना सांगितले.