
सुप्रीम कोर्टात आज दोन विषयावर लोक गेलेले. एक विषय होता की, ओबीसींच आरक्षण ते राहणार की नाही, त्या विरोधात हे लोक गेलेले. 2022 च्या कायद्यानुसार विनाआरक्षणाशिवाय निवडणूका घ्या.
2022 मध्ये इथे मविआच सरकार होतं. त्यांनी रचना केलेली तशा निवडणूक घ्या. त्या मागण्या सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्या. ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका होतील. 2017 च्या रचनेनुसारच निवडणूका होतील” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
कबुतर खाने बंद करण्याच्या विषयावर मुख्यमंत्री म्हणाले की, “या संदर्भात नांदणीचा विषय आणि कबुतरखान्याचा विषय या दोन्ही विषयांवर उद्या मी बैठक बोलवलेली आहे. हे दोन्ही न्यायालयाचे निर्णय आहेत. आमचे निर्णय नाहीत. पण जनभावनाही लक्षात घेतली पाहिजे” “काय मार्ग काढता येईल त्या संदर्भात आमचा प्रयत्न आहे. अभ्यास आम्ही केलेला आहे. काही प्रमुख लोकांशी चर्चा करणार आहोत. या दोन्ही विषयात कसा मार्ग काढता येईल हा प्रयत्न आहे” असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.
‘तो पर्यंत लोक त्यांना मतदान करणार नाहीत’
उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींच्या डिनर डिप्लोमसीच्या प्रश्नावरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलं. “मला वाटतं, त्यांनी डिनर डिप्लोमसी करावी, लंच डिप्लोमसी करावी, ब्रेकफास्ट डिप्लोमसी करावी. जो पर्यंत ते हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मार्ग सोडून दुसऱ्या मार्गावर जातील तो पर्यंत लोक त्यांना मतदान करणार नाहीत” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
वॉररुमच्या माध्यमातून 33 प्रोजेक्ट ट्रॅक
“वॉररुमच्या माध्यमातून 33 प्रोजेक्ट ट्रॅक करतोय. या प्रकल्पातून 133 प्रश्न निर्माण झालेले. एप्रिल 2025 रोजी बैठक झालेली. यात 61 विषय सोडवले गेले. उरलेल्या विषयांवर बैठक पार पडली. ते सोडवण्याचा प्रयत्न आहे. यात पुणे, मुंबई मेट्रो प्रोजेक्ट, गडचिरोली, वर्धा रेल्वे प्रोजेक्टचे विषय आहेत. फास्ट ट्रॅकवर हे सर्व प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे” असं ते म्हणाले.
‘अर्धवट वाक्य कापून चालवायची बंद करा’
शिवसेनेचा बाप मीच आहे असं परिणय फुके म्हणाले, त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अलीकडच्या काळात वाक्य कापून दाखवणं, त्याच्यावर दिवस काढणं सुरु आहे. ते बंद करा. मला माहित होतं, तुम्ही विचारणार” “ते म्हणाले कुठल्याही गोष्टीच श्रेय आईला जातं. चुकलं तर बापावर जातं. भंडाऱ्यात काहीही झालं तरी शिवसेनेचे लोक माझ्यावर टाकतात. त्याचं म्हणणं पूर्ण कॉन्टेक्समध्ये समजून घेतलं तर शिवसेनेचा बाप मीच आहे असा त्याचा अर्थ होत नाही. अर्धवट वाक्य कापून चालवायची बंद करा” असं फडणवीस म्हणाले.
निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची काय प्रतिक्रिया?
निशिकांत दुबे म्हणाले की, महापालिका निवडणुकीनंतर ठाकरेंच महाराष्ट्रातील राजकारण संपणार, “माझं स्पष्ट मत आहे की, निशिकांत दुबे यांनी अशी वक्तव्य करण्याची गरज नाहीय. इथली परिस्थिती हाताळण्याकरता आम्ही सक्षम आहोत. इथला मराठी माणूस आणि अमराठी माणूस दोघेही सुरक्षित आहेत. दोघेही योग्य प्रकारे नांदतायत. महाराष्ट्रात मराठी आणि गैरमराठी असा वाद नाहीय. काही लोक असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यांना मराठी लोक, अमराठी लोक निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवतील. माझा निशिकांत दुबे यांना सल्ला आहे की, त्यांनी अशी वक्तव्य करु नयेत.