
भारताची रशियाकडून तेल खरेदी सुरु असल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नाराज आहेत. सातत्याने ते भारताला धमक्या देत आहेत. 25 टक्के टॅरिफसोबतच रशियासोबत व्यापार केल्यास दंड आकारण्याची धमकी दिली आहे.
भारताच्या या तेल खरेदीमुळे रशियन अर्थव्यवस्थेला फायदा होत असून त्यामुळे रशियाला युक्रेन विरोधात युद्ध लढण्यासाठी बळ मिळतय असं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे. दुसऱ्याबाजूला भारताला रशियाकडून स्वस्तात तेल मिळत आहे. म्हणजे या व्यापारात भारत-रशिया दोघांचा फायदा होतोय. भारतापेक्षा चीन रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करतोय, पण त्या बद्दल बोलणं डोनाल्ड ट्रम्प सोयीस्करपणे टाळत आहेत. ट्रम्प यांच्या धमकीनंतर आता युक्रेनने भारतावर मोठा आरोप केला आहे. युद्धात रशियन सैन्य जे इराणी डिझाइन्सचे ड्रोन्स वापरतेय, त्यातील इलेक्ट्रॉनिक्सच्या सुट्ट्या भागांची निर्मिती भारतात होते असा युक्रेनचा दावा आहे.
या विषयाशी संबंधित लोकांनी सांगितलं की, युक्रेनने भारत सरकार आणि यूरोपीय संघासमोर (EU) हा मुद्दा उपस्थित केला आहे. इराणी डिझाइनच्या ड्रोन्समध्ये भारतीय कंपन्यांनी बनवलेले इलेक्ट्रॉनिकचे सुट्टे भाग आहेत. कागदपत्रांनुसार इराणी डिझाइनच्या शाहिद ड्रोनध्ये भारतीय कंपनी विशाय इंटरटेक्नोलॉजीचा ब्रिज रेक्टिफायर E300359 वापरला आहे. ड्रोनच्या सॅटेलाइट नेविगेशन सिस्टमच्या जॅमर-प्रूफ अँटीनामध्ये ऑरा सेमीकंडक्टर द्वारा निर्मित PLL-आधारित सिग्नल जनरेटर AU5426A चीप वापरण्यात आली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, टेक्निकल आधारावर दोन्ही कंपन्यांनी कुठल्याही भारतीय कायद्याच उल्लंघन केलेलं नाही.
परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने काय म्हटलं?
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी या विषयावर एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की, “भारताद्नारे दुहेरी वापराच्या वस्तुंची निर्यात परमाणू अप्रसार आणि अंतरराष्ट्रीय नियमांनुसार आहे. मजबूत देशांतर्गत कायदा आणि नियामक व्यवस्थेवर आधारित आहे. अशा निर्यातीमुळे आमच्या कुठल्याही कायद्याच उल्लंघन होऊ नये म्हणून योग्य तपासणी केली जाते” युक्रेन विरोधात रशियाने मोठ्या प्रमाणात इराणी ड्रोन्सचा वापर केला. सध्याच्या आधुनिक युद्धात ड्रोन्स कुठल्याही लढाईची दिशा बदलू शकतात हे दिसून आलय. भारताने ऑपरेशन सिंदूरच्यावेळी याच ड्रोन्सचा वापर करुन पाकिस्तानला हादरवलं होतं.