
शिवसेनेच्या बैठकीत गोंधळ; शिंदेंचे शिलेदार हमरीतुमरीवर उतरले…
शिवसेनेच्या पंढरपूर येथील बैठकीत दिग्विजय बागल आणि महेश चिवटे यांच्यात जोरदार वाद झाला.
पक्षनिरीक्षकांसमोरच एकमेकांना बघून घेण्याची भाषा वापरल्याने बैठकीचं रूपांतर गोंधळात झालं.
या वादामुळे करमाळा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून मोर्चे बांधणीला वेग आला आहे. पक्ष पातळीवर बैठका आणि मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे. पंढरपूर येथीही अशाच एका बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. यासाठी पक्षनिरीक्षक गेले होते. पण त्यांच्यासमोरच करमाळा विधानसभा निवडणूक लढवलेले दिग्विजय बागल व शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे भिडले. त्यांच्यात जोरदार हमरीतुमरी झाली असून दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची भाषा वापरली. यामुळे तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. यावेळी करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, मकाईचे संचालक आशिष गायकवाड, सतिश नीळ, कुलदीप पाटील, रंगनाथ शिंदे यांच्यासह दिग्विजय बागल व महेश चिवटे यांचे समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते.
पंढरपूर येथे आयोजित बैठकीच्या वेळी दिग्विजय बागल यांनी आपण शिवसेना वाढीसाठी तालुकाभर काम करत आहोत. शिवसेनेच्या शाखा उघडण्यासाठी पुढाकार घेत आहोत. पण जिल्हाप्रमुख आपल्याला विश्वासात घेत नाहीत, अशी तक्रार केली. थेट पक्षनिरीक्षकांकडेच तक्रार झाल्याने जिल्हाप्रमुख महेश चिवटे भडकले.
तसेच त्यांनी बागल यांना सुनावत, तुझी बहीण भाजपमध्ये, तू शिवसेनेत… दोघेही बहीण भाऊ एकाच गाडीत मुंबईला जाता, त्या भाजप कार्यालयाकडे आणि तू शिवसेनेकडे जातो. तुम्ही बागलांनी तालुक्यातील दोन्हीही साखर कारखाने (आदिनाथ सहकारी साखर कारखाना व मकाई सह. साखर कारखाना) लुटून खाल्ले असा आरोप केला. यामुळे बैठकीतील वातावरण चांगलेच तापले होते.
चिवटे यांनी बागल यांच्यावर केलेल्या आरोपानंतर बागलही भडकले आणि त्यांच्यात हमरीतुमरी झाली. यावेळी तुझ्याकडे बघतोच अशी भाषा बागल यांनी वापरली. तर काय बघायचे ते आत्ताच बघून घे असे प्रतिआव्हान चिवटे यांनी दिले. तसेच तू बाहेर ये, तू करमाळ्यात ये तुला दाखवतो असेही बागल यांनी चिवटे यांना धमकावले.
ज्यावर संतापलेल्या चिवटे यांनी, काय बघायचे ते बघ. करमाळ्यातच काय तर तुझ्या मांगीत मी येतो. तू काय करतोस तेच बघतो, असे उलट उत्तर दिल्याने बैठकीत गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी उपस्थितांनी दोघांनाही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ते काही शांत झाले नाहीत.
माजी आमदार शामलताई बागल यांचे चिरंजीव मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी शिवसेना पक्षाकडून करमाळा विधानसभा निवडणूक लढवली होती. तेव्हा पासून ते शिवसेनेत सक्रिय झाले आहेत. विधानसभा निवडणूक दिग्विजय बागल यांच्या प्रचारासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे शिवसेनेकडून सक्रिय होते.
मात्र विधानसभा निवडणुकीनंतर महेश चिवटे आणि दिग्विजय बागल यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. ते आज पंढरपूर येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत पक्षनिरीक्षकांच्या समोरच उफाळून आले. याची आता जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू असून या प्रकरणाकडे पक्षश्रेष्ठी कसे पाहतात हेच पाहावं लागणार आहे.