
मोठ्या पराक्रमाबद्दल असं केलं अभिनंदन…
मोहम्मद सिराजला ‘डीएसपी सिराज’ म्हटले जाते, कारण तो तेलंगणा पोलीसमध्ये डीएसपी पदावर आहे. इंग्लंडविरुद्ध भारताच्या या वेगवान गोलंदाजाने इंग्रज फलंदाजांना गुडघे टेकायला लावले.
सिराजने या मालिकेत 1000 हून अधिक षटके टाकली आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारताच्या विजयासाठी आपले सर्वस्व पणाला लावले. सिराजच्या या गोलंदाजीने सर्व देशवासियांची मने जिंकली आहेत. तर तेलंगणा पोलिसांनी आपल्या ‘डीएसपी’साठी एक शानदार पोस्ट शेअर केली आहे.
तेलंगणा पोलिसांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर पोस्ट करून लिहिले की, “मोहम्मद सिराज, डीएसपी यांचे अभिनंदन! इंग्लंडविरुद्ध भारताच्या ऐतिहासिक विजयातील शानदार कामगिरीसाठी. तुम्ही तेलंगणाचे गौरव आहात. तुम्ही वर्दीमध्ये आणि खेळात दोन्हीमध्ये नायक आहात.” या कॅप्शनसोबतच तेलंगणा पोलिसांनी सिराजसोबतचा फोटोही शेअर केला आहे.
मोहम्मद सिराजने या मालिकेत 1,113 षटके टाकली आहेत. सिराजने या मालिकेत पूर्णपणे वर्चस्व गाजवले. पाचव्या कसोटीत सिराजने 9 विकेट्स घेतल्या, ज्यामुळे भारताला शेवटच्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध विजय मिळाला आणि ही मालिका 2-2 अशा बरोबरीत संपली. सिराजने या मालिकेत एकूण 23 विकेट्स घेतल्या. यासोबतच तो अँडरसन-तेंडुलकर मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे.
सचिन तेंडुलकरपासून ते विराट कोहलीपर्यंत सर्व दिग्गज खेळाडूंनी मोहम्मद सिराजचे कौतुक केले आहे. सिराजने ओव्हल कसोटीच्या पाचव्या दिवशी एक नवा कीर्तिमान रचला. या सामन्यात भारताला इंग्लंडचे 4 विकेट्स घ्यायचे होते, त्यापैकी सिराजनेच 3 विकेट्स घेतल्या आणि या कठीण सामन्यात इंग्लंडचा पराभव केला.