
अखेर खडसेंचा संयम सुटला !
काही दिवसांपूर्वी पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकाला होता, या प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आलं आहे, ते सध्या जेलमध्ये आहेत.
या प्रकरणात आता महिला आयोगाची एन्ट्री झाली आहे, या प्रकरणावर बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मोठी मागणी केली आहे.
या प्रकरणाचा महिलांची तस्करी या दृष्टीनेही तपास करावा, असं महिला आयोगानं म्हटलं आहे. तसेच आता या प्रकरणात पत्रकार परिषद घेत रुपाली चाकणकर यांनी एकनाथ खडसे यांच्या जावयावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. खेवलकरांच्या मोबाईलमध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो आहेत, असा आरोप चाकणकर यांनी केला आहे. दरम्यान चाकणकर यांच्या या आरोपानंतर आता एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले खडसे?
रुपाली चाकणकर या चेकाळल्या आहेत, दोन महिन्यांपासून सरकारवर आम्ही हल्ला करतोय त्यामुळे रोहिणी खडसे आणि माझं तोंड दाबण्याचे उपद्वाप सरकारचे चालू आहेत. माझ्या जावयाने जर असं केलं असेल तर मला लाज वाटेल, तो दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. तो जर दोषी असेल तर त्याला फाशी देखील झाली तरी मी त्याच्या समर्थनार्थ काही करणार नाही, असा नालायक प्रकार करणारा जावई मला नको आहे.
पण रुपाली चाकणकर यांना हे सगळं सांगण्याचा अधिकार कोणी दिला? रुपाली चाकणकर तुम्ही तपास अधिकारी कधी झाल्या? मानवी तस्करीमध्ये नाशिकचं हानी ट्रॅप प्रकरण येत नाही का? मंत्री हानी ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत, त्याच्यावर तुम्ही बोलत नाहीत का? असा सवाल यावेळी खडसे यांनी केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना खडसे यांनी म्हटलं की, गिरीश महाजन, प्रफुल लोढा यांच्यावर बोला, एसआयटी मार्फत कशाला चौकशी करतात सीबीआय मार्फत करा. आम्हाला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र सुरू आहे. मला पोलिसांवर संशय यायला लागला आहे. प्रफुल लोढा, गिरीश महाजन यांच्यामुळे महाराष्ट्र बदनाम होत नाही का? हगवणे कुटुंबींयावर चाकणकर तुम्ही का बोलत नाहीत? असं यावेळी खडसे यांनी म्हटलं आहे.