
मंत्र्यांना भरला दम म्हणाले; तर थेट घरी…
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच होणार असल्याने सर्वच पक्षाकडून सध्या लगीनघाई सुरु आहे. त्यातच आगामी काळात होत असलेली निवडणूक महायुती एकत्रित लढणार असल्याने आता तयारीला वेग आला आहे.
त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पीएम नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर आता एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर आले आहेत. त्यासोबतच त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंत्री कोकाटेंच्या प्रकरणानंतर माध्यमांमध्ये कमी बोला अन काम जास्त करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासोबतच मंत्र्यांना जबाबदारी दिलेल्या जिल्ह्यात निवडणुकांमध्ये अपेक्षित निकाल दिसला पाहिजे, असा सज्जड दम भरला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा सलग दुसऱ्या आठवड्यात केलेला दिल्ली दौरा चर्चेत आला आहे. एकनाथ शिंदेंनी आपल्या दौऱ्यात आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास 25 मिनिटं एकांतात चर्चा झाली. तसेच शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांसोबत घेऊनही एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर एकनाथ शिंदे कामाला लागले आहेत.
पावसाळी अधिवेशनावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे काही मंत्री अडचणीत सापडले होते. त्यामुळे विरोधकाकडून टीका केली जात होती. विशेषतः मंत्री संजय शिरसाट, योगेश कदम, संजय राठोड यांच्या कारभारामुळे तर आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीमुळे वातावरण चांगलेच तापले होते. या सर्व प्रकारामुळे या मंत्र्यांच्या अडचणीत वाढही झाली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या मंत्र्यांची कानउघाडणी केली आहे. हे करीत असताना त्यांनी अडीच वर्षानंतर प्रत्येक मंत्र्यांचा परफॉर्मन्स कसा आहे याची दखल घेतली जाणार आहे. परफॉर्मन्स चांगला नसलेल्या मंत्र्यांना त्यांनी यातून सूचक इशारा दिला आहे.
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना सभागृहात रमी खेळणे व वादग्रस्त वक्तव्य करणे अंगलट आले आहे. त्यांच्याकडील कृषीखाते मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवले आहे. त्यामुळेच शिंदे यांनी यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांना कमी बोलण्याच्या सूचना केल्या आहेत. या प्रकरणानंतर माध्यमांमध्ये बोलणं कमी आणि काम जास्त करण्याचा सल्लाही दिला आहे.
गेल्या काही दिवसात मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्य सरकारसमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळेच जनमानसात महायुती सरकारची प्रतिमा डागाळली जात आहे. त्याचा फटका राज्य सरकारला सहन करावा लागत आहे. विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर दिलेच पहिजे असे नाही, त्यांना कामातून उत्तर द्या, अशी तंबीच वाचाळवीर मंत्र्यांना एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यासोबतच मंत्र्यांना जबाबदारी दिलेल्या जिल्ह्यातून निवडणुकांमध्ये अपेक्षित निकाल दिसला पाहिजे, असेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे बजावले आहे.
शिंदे यांनी शिवसेनेच्या (Shivsena) मंत्र्यांची कानउघडणी केली आहे. त्यानंतर आता येत्या काळात मंत्र्यांच्या वागण्यात काही फरक पडतो का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. हे करीत असताना अप्रत्यक्षरित्या शिंदेंनी मंत्र्यांना अडीच वर्षाच्या कालावधीची आठवण करून दिली आहे. परफॉर्मन्स नसलेल्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातुन वगळण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. शिंदे यांनी मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना त्यांच्या कामगिरीवरून फटकारले आहे. ज्यांची कामगिरी समाधानकारक नाही, अशा मंत्र्यांना त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की त्यांनी कामगिरी सुधारावी, अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागू शकते.
शिंदे यांच्यावर विरोधकांच्या दबाव वाढत असला तरी या दोन वादग्रस्त मंत्र्यांना संरक्षण दिले आहे. मंत्रिमंडळातील मंत्री संजय शिरसाट व योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. त्यामुळे या दोघांना तूर्तास तरी त्यांनी वॉर्निंगच देत अभय दिला आहे. त्यामुळे येत्या काळात कारवाई करणार का? त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.