
दैनिक चालु वार्ता ठाणे ग्रामीण प्रतिनिधी -विकी जाधव
—————————–
कल्याण तालुका, दि. 8 ऑगस्ट 2025 (प्रतिनिधी):
शुक्रवारी अंबरनाथ शहराच्या वेशीवर असलेल्या कल्याण तालुक्यातील जांभूळ गावातील गुरचरण परिसरात काही गोवंश जनावरांचे अवशेष सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेने गावात संतापाचे वातावरण असून, ग्रामस्थांसोबत विश्व हिंदू परिषद व भारतीय जनता पार्टी पदाधिकाऱ्यांनीही या प्रकरणात सक्रिय सहभाग घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जांभूळ गावातील काळुराम वाघे यांची गाय बेपत्ता असल्याने ते शोधण्यासाठी गुरचरण परिसरात गेले असता त्यांना काही गोवंश जनावरांचे अवशेष आढळले. याबाबतची माहिती जांभूळ ग्रामपंचायतीचे सरपंच परिक्षित पिसाळ यांनी दिली. “घटनेनंतर आम्ही तातडीने कल्याण ग्रामीण पोलिसांना माहिती दिली असून त्यांनी घटनास्थळी पाहणी करून नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत,” असे पिसाळ यांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच विश्व हिंदू परिषद पदाधिकारी व कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आणि ग्रामस्थांसोबत चर्चा करून प्रशासनावर दबाव आणला. त्याचबरोबर, भारतीय जनता पार्टीचे अंबरनाथ पूर्व मंडल अध्यक्ष विश्वजीत गुलाबराव करंजुले-पाटील यांनीही घटनास्थळी धाव घेऊन पोलिस प्रशासनाला तात्काळ व कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
कल्याण ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 0427/2025 नोंदवला असून, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5, 9(अ), 9(ब), 12, 13 तसेच पशु क्रूरता प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11(1)(I) अंतर्गत तपास सुरू आहे.
यापूर्वीही परिसरात अशा घटना घडल्या असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. विशेषतः शेजारील अंबरनाथ–बदलापूर कचराभूमीवर चरण्यासाठी गेलेल्या काही गाई यापूर्वी बेपत्ता झाल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या प्रकरणी दोषींना तातडीने शोधून कठोर शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थ, विश्व हिंदू परिषद आणि भाजप पदाधिकाऱ्यांकडून होत आहे.
दरम्यान, पोलिस प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करून बदलापूरकडून येणारा रस्ता बंद करण्यात आला आहे.