
पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीरने अमेरिका दौऱ्यादरम्यान भारताबद्दल एक टिप्पणी केली. असीम मुनीरच्या या वक्तव्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तिखट शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ही पाकिस्तानची अणवस्त्र तलवार दाखवण्याची सवय असल्याच म्हटलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जायस्वाल म्हणाले की, “अणवस्त्र शस्त्रांची धमकी देणं पाकिस्तानची जुनी सवय आहे. अशा प्रकारची वक्तव्य किती बेजबाबदारपणाची आहेत, हे आंतरराष्ट्रीय समुदायाला दिसतय. अशी वक्तव्य आधीपासून जो संशय आहे, त्याला अजून बळकटी देतात. ज्या देशाच सैन्य दहशतवादी संघटनांसोबत आहे. तिथे अणवस्त्रांच नियंत्रण आणि जबाबदारीवर विश्वास ठेवता येणार नाही”
परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या स्टेटमेंटमध्ये अमेरिकेचा सुद्धा उल्लेख केला. “अशी वक्तव्य त्या देशाच्या भूमिवरुन केली जातायत, ज्यांचे भारतासोबत चांगले संबंध आहेत. ही खेदाची बाब आहे” असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलय. “आम्ही अणवस्त्र ब्लॅकमेलिंग समोर झुकणार नाही, हे भारताने आधीच स्पष्ट केलय. आम्ही आमच्या राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात सर्व आवश्यक पावलं उचलत राहू”
‘आम्ही निम्म्या जगाला सोबत घेऊन बुडणार’
पाकिस्तानचा सैन्य प्रमुख असीम मुनीरने अमेरिकेच्या फ्लोरिडामधून भारताला अणवस्त्र हल्ल्याची धमकी दिली. फ्लोरिडात प्रवासी पाकिस्तानींना संबोधित करताना मुनीर म्हणाले की, “पाकिस्तान एक अणवस्त्र संपन्न देश आहे. जर कोणी पाकिस्तानला बुडवायचा प्रयत्न केला, तर आम्ही निम्म्या जगाला सोबत घेऊन बुडणार” पाकिस्तानी सैन्य प्रमुखाने सिंधू नदी कराराचा उल्लेख केला. “भारत सिंधू नदीवर डॅम बनवतोय. आधी धरण बांधू दे, आम्ही मिसाइल हल्ल्याने ते धरण फोडून टाकू”
उपासमारीच्या संकटाचा सामना
टैम्पामधील पाकिस्तानचे मानद वाणिज्य दूत अदनान असद यांच्यासाठी एक ब्लॅक-टाई डिनरचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात असीम मुनीरने अणवस्त्र धमकीचा जुना राग आळवला. भारत पाकिस्तानच्या अणवस्त्र धमकीला अजिबात भीक घालत नाही, हे ऑपरेशन सिंदूरच्यावेळीच स्पष्ट झालय. अणवस्त्र धमकीनंतर मुनीरने सिंधू जल कराराचा मुद्दा उपस्थित केला. भारताने हा करार स्थगित केल्यामुळे 25 कोटी लोक उपासमारीच्या संकटाचा सामना करत आहेत, असं मुनीर म्हणाला.