
एका महिन्यात आमदार झालेल्यांना कधी कळावी…
(स्व.) राजूबापू पाटील स्मृती पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या निमित्त पंढरपूर-माढ्यातील दिग्गज नेते आज (ता. 10ऑगस्ट) पंढरपुरात एकत्र आले होते. या सर्व नेत्यांनी माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्यावर नाव न घेता जोरदार निशाणा साधला.
तीन तीन टर्म आमदार झालेल्यांना अजून आमदारकी कळली नाही. एका महिन्यात आमदार झालेल्याला कधी कळावी, असा टोला माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी नाव न घेता अभिजीत पाटलांना लगावला.
पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे आज (स्व.) राजूबापू पाटील स्मृती पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्या कार्यक्रमाला माजी आमदार प्रशांत परिचारक माजी आमदार संजयमामा शिंदे, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, व्हा. चेअरमन भारत कोळेकर, कैलास खुळे, शहाजी साळुंखे, सरपंच ॲड. गणेश पाटील, शिवाजीराजे कांबळे, रावसाहेब पाटील, लतीफ तांबोळी, प्रशांत देशमुख, शालिवाहन कोळेकर उपस्थित होते.
माजी आमदार संजयमामा शिंदे म्हणाले, विधानसभेच्या तीन तीन निवडणुका जिंकलेल्या नेत्यांना अजून आमदारकी नीट कळालेली नाही आणि एका महिन्यात आमदार झालेल्यांना कधी कळावी. आगामी काळात आपण सर्वजण एकत्र राहून नैतिकतेचे राजकारण पुन्हा आणूयात. गणेशदादा (गणेश पाटील) तुम्ही निश्चिंत राहा, तुमच्यासोबत आम्ही सर्वजण आहोत.
माजी आमदार प्रशांत पारिचारक यांनीही आमदार अभिजीत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, पूर्वीच्या काळीही राजकारणात मतभेद असायचे. एकमेकांवर टीका टिपण्णी केली जायची. मात्र, त्यांच्यात मनभेद नव्हते, त्यामुळे सुडाचे राजकारण पूर्वी कधीही पहायला मिळाले नव्हते. राजकारण आणि निवडणुकीत यश-अपयश येत असते. मात्र, त्याही परिस्थितीत टिकून राहणं महत्वाचं आहे.
सध्याच्या राजकीय परिस्थिती कुणीही कुणाच्याही पाया पडून तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपये आणतं आणि आमदार होते, असा टोला प्रशांत परिचारक यांनी आमदार अभिजीत पाटील यांचे नाव न घेता लगावला.
(स्व.) राजूबापू पाटील आज असते, तर पंढरपूर तालुक्याचे चित्र वेगळे बघायला मिळाले असते, असे सांगून संघर्ष हा तर आपल्या पाचवीलाच पुजलेला आहे. या संघर्षाला तोंड देत आपण सारे मिळून पुढे जाऊया, असे कल्याणराव काळे यांनी म्हटले आहे.