
कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील ‘माधुरी’ ऊर्फ ‘महादेवी’ हत्तीणीला गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात पाठवण्यात आले होते. त्यामुळे शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यासह ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती.
तसेच कोल्हापूरकर आणि अंबानी यांच्यात वाद निर्माण झाला होता. मात्र आता हा वाद मिटला असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
अनंत अंबानींच्या पुढाकाराने वाद संपला – राजू शेट्टी
राजू शेट्टी म्हणाले की, माधुरी हत्तीणीबाबत सुरु झालेला वाद आता संपला आहे. वनताराने म्हटले आहे की, वनतारामध्ये जे उपचार देण्यात येणार होते, तेच उपचार नांदणी मठाच्या आसपास दिली जाणार आहे. यासाठी वनताराचे वैद्यकीय पथक नांदणीत येणार आहे. त्यामुळे आता वाद मिटला आहे. हा वाद मिटवण्यासाठी अंबानी कुटूंब आणि अनंत अंबानी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे मी या निर्णयाचे स्वागत करतो.
पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, माधुरी हत्ती पुन्हा एकदा नांदणी मठात येण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल होणार आहे. नांदणी मठ, राज्य सरकार आणि वनतारा या याचिकेत संयुक्तरित्या असणार आहेत. माधुरी हत्तीण ही नांदणी मठात आली पाहिजे ही आमची भूमिका आहे. यात कुठेही मी माझ्या भूमिकेपासून बाजूला गेलेलो नाही.
महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी कोर्टात जाणार
माधुरी उर्फ महादेवी हत्तीणी परत आणण्यासाठी वकिलांच्या मार्फत प्रस्ताव तयार केला जात आहे. हा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयात सादर केला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालय महादेवी हत्तीनीला परत पाठवत असताना तिच्या आरोग्याची काळजी देखील घेतली जाणार आहे.
पेटावर टीका
आता पेटानं चोमडेपणा करायचं काहीही कारण नाही. महादेवी हत्तीणीवरती महाराष्ट्रात कुठेच उपचार होणार नाहीत असे पेटाने अकलेचे तारे तोडू नयेत. पेटा या संस्थेने हत्तीणीला मठात ठेवायचं नाही, यासाठी सरळ सरळ सुपारी घेतली आहे. महाराष्ट्रातील अन्य आणि कर्नाटकातील अन्य हत्तींना देखील बाहेर काढण्याची सुपारी पेटाने घेतलेली दिसते. कित्येक वर्षाच्या रूढी परंपरा आणि चालीरीती मोडून पेटाला नक्की काय साध्य करायचं आहे? पेटाने सुपारी घेण्याची वृत्ती आणि असले धंदे बंद करावेत. हत्तीणीची काळजी करायला आम्ही समर्थ आहोत असं विधानही शेट्टी यांनी केलं आहे.