
पण नेमकं कसं…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या वस्तूंवर तब्बल 50 टक्के आयातशुल्क लावले आहे. अमेरिकेच्या या एका निर्णयाचा भारतीय व्यापाराला फटका बसत आहे.
वस्त्रोद्योग, मत्स्योद्योग तसेच इतरही क्षेत्राला झळ बसताना दिसत आहे. भारताच्या रशियासोबतच्या तेल व्यापारावर अमेरिकेने आक्षेप घेतलेला आहे. दरम्यान, भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ थोपवल्यानंतर आता येत्या 15 ऑगस्ट रोजी डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांची एक बैठक होणार आहे. या बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. असे असतानाच आता याच बैठकीमुळे भारताला एक मोठी गुडन्यूज मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
…तर भारताला होणार फायदा
मिळालेल्या माहितीनुसार येत्या 15 ऑगस्ट रोजी ट्रम्प आणि पुतिन यांची भेट होणार आहे. या भेटीत रशिया-युक्रेन या दोन्ही देशांदरम्यान चालू असलेल्या युद्धावर चर्चा होणार आहे. बलाढ्य देशांच्या या दोन्ही सर्वोच्च नेत्यांची ही बैठक असल्याने लवकरच रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध थांबू शकते असे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे ही शक्यता सत्यात उतरली तर भारतालाही त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. याबाबत अमेरिकेतील दक्षिण आशियातील जागतिक राजकारणाचे विश्लेषक मायकल गुकेलमॅन यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. ट्रम्प आणि पुतिन यांच्या भेटीमुळे भारताची जाचक टॅरिफमधून सुटका होऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे.
भारताची टॅरिफमधून सुटका कशी होऊ शकते?
यांनी सांगितल्यानुसार ट्रम्प आणि पुतिन यांची भेट ही भारतासाठी फार महत्त्वाची आहे. कारण या बैठकीचा आणि भारतावर लादण्यात आलेल्या टॅरिफचा महत्त्वाचा संबंध आहे. त्यामुळेच ट्रम्प आणि पुतिन यांच्यात सकारात्मक चर्चा झाली तर भारताला टॅरिफमध्ये सूट मिळू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच या बैठकीत रशियाने युद्धविरामास सहमती दर्शवल्यास भारतावरील टॅरिफच्या माध्यमातून टाकण्यात आलेला दबावही कमी होऊ शकते, असेही मायकल यांचे मत आहे.
भारताची जाचक टॅरिफमधून कशी सुटका होऊ शकते?
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ वाढवताना भारत आणि रशिया यांच्यातील तेल व्यापाराचा हवाला दिला होता. भारत रशियाकडून तेलाची आयात करतो. तसेच भारत हे तेल दुसऱ्यांनाही विकतो, असा दावा करत ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ वाढवला होता. भारत आणि रशिया यांच्यातील व्यापारावर प्रभाव पडावा म्हणून ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला होता. मात्र रशियाने युक्रेनसोबतच्या युद्धातून माघार घेतल्यानंतर अमेरिकेला रशियावर तसेच रशियासोबत व्यापार करणाऱ्या राष्ट्रांवर दबाव टाकण्याची गरज भासणार नाही. त्यामुळेच कदाचित ट्रम्प भारतावरील टॅरिफ कमी करू शकतात, असा तर्क लावला जात आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.