
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच नुकसान होत आहे. लाखोंचे रोजगार संकटात सापडले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी हा जो निर्णय घेतला, त्यामागे ज्या माणसाचा विचार आहे, तो म्हणजे पीटर नवारो.
या नवारोने भारतावर कठोर शब्दात टीका केली आहे. रशियन तेल आणि संरक्षण साहित्य खरेदी करण्याबद्दल या पीटर नवारोंनी भारतावर जोरदार टीका केली. नवी दिल्लीने त्यांचं धोरण बदलावं, यासाठी भारताला लागेल अशा ठिकाणी मारण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला. फायनान्शिल टाइम्समध्ये त्यांनी एक स्तंभ लिहिला आहे. पीटर नवारो यांच्यामते भारताचा रशियासोबत तेल व्यापार हा संधीसाधूपणा आहे. रशियन अर्थव्यवस्थेला एकाकी पाडण्याच्या मार्गात भारत खोडा घालत असल्याच त्यांचं म्हणणं आहे.
अर्थशास्त्राचे माजी प्राध्यापक पीटर नवारो हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांचे व्यापार सल्लागार होते. अमेरिकेने अन्य देशांवर सुद्धा तितकाच टॅरिफ आकारावा, या विचारामागे पीटर नवारो यांचीच मुख्य भूमिका आहे. भारत अमेरिकेसोबत व्यापार करुन डॉलरची कमाई करतो आणि नंतर तोच पैसा रशियन तेल खरेदीसाठी वापरतो असं पीटर नवारो यांनी स्तंभात लिहिलं आहे.
‘तेल खरेदीमागे देशांतर्गत गरज हा एकमेव उद्देश नाही’
भारताच्या आर्थिक पाठबळाच्या जोरावर रशिया युक्रेनवर हल्ला करतो. त्याचवेळी अमेरिका आणि युरोपला करदात्यांचा पैसा अब्जावधी युक्रेनच्या संरक्षणावर खर्च करावे लागतायत. 3 लाखापेक्षा जास्त सैनिक आणि नागरिकांचा मृत्यू झाला आहे” असं नवारो यांनी लिहिलं आहे. नवारो यांनी आपल्य स्तंभामधून भारताचे तेल शुद्धीकरण करणारे कारखाने आणि त्यातल्या नफेखोरीवर सुद्धा जोरदार टीका केली. “रशियाकडून सवलतीच्या दरात तेल खरेदी करायची आणि नंतर त्यावर प्रोसेस करुन तीच पेट्रोलियम उत्पादने युरोप, आफ्रिका आणि आशियामध्ये विकतात. भारताने 2022 नंतर रशियाकडून तेल आयात वाढवली. त्यामागे देशांतर्गत गरज भागवणं हा एकमेव उद्देश नव्हता” असं पीटर नवारो म्हणाले.
‘भारताला तसं वागावं लागेल’
बायडेन प्रशासनाने या रणनितीक आणि भूराजनितीक समस्येकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिलं. आज डोनाल्ड ट्रम्प प्रशासन त्यांचा सामना करतय” असं पीटर नवारो म्हणाले. “भारताला वाटत असेल की, अमेरिकेकडून रणनितीक भागीदारासारखी वागणूक मिळावी, तर त्यांना तसं वागाव लागेल” असं पीटर नवारो यांनी स्पष्ट केलं. सध्या डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावला आहे. येत्या 27 ऑगस्टपासून रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लागेल. असा एकूण मिळून भारतावर 50 टक्के टॅरिफ आकारला जाईल.