
गेल्या काही वर्षांपासून प्रसिद्धीझोतापासून दूर राहिलेला अभिनेता गोविंदा जेव्हा कधी एखाद्या कार्यक्रमात पोहोचतो, तेव्हा सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतो. असंच काहीसं जन्माष्टमीच्या सेलिब्रेशनदरम्यान पहायला मिळालं.
दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यासाठी पोहोचलेल्या गोविंदाने स्टेजवर जबरदस्त डान्स करत चाहत्यांची मनं जिंकली. यावेळी मंचावर मागे उभे असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा त्याला पाहतच राहिले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. ‘गोविंदा आजही हिरो नंबर वन’ असल्याची कमेंट अनेकांनी केली आहे.
अभिनेता शरद केळकरसह गोविंदा दहीहंडी उत्सवात सहभागी झाला होता. चाहत्यांच्या आग्रहाखातर त्याने पावसातही मंचावर डान्स केला. आपल्याच काही लोकप्रिय गाण्यांवर त्याने ठेका धरला होता. त्याचा हा डान्स पाहून उपस्थित लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि शिट्ट्या वाजवल्या. मंचावर मागे उभे असलेले एकनाथ शिंदे आणि शरद केळकर त्याच्या डान्सकडे पाहतच राहिले. त्यानंतर गोविंदा त्यांच्याकडे वळताच शिंदेंनी हात जोडले. या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून गोविंदात्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिला आहे. पत्नी सुनिता अहुजाला तो घटस्फोट देत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. इतकंच नव्हे तर सुनिता आणि गोविंदा वेगवेगळे राहत असल्याचंही म्हटलं गेलं होतं. परंतु या चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं नंतर सुनिताने स्पष्ट केलं. तर दुसरीकडे सुनिताने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता, परंतु नंतर दोघांनी चर्चा करून त्यातून मार्ग काढण्याचा निर्णय घेतल्याचं, गोविंदाच्या वकिलाने सांगितलं होतं. गोविंदा सध्या कोणत्याही चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत नसला तरी विविध कार्यक्रमांमध्ये त्याची उपस्थिती पहायला मिळते.
गोविंदा जेव्हा फिल्म इंडस्ट्रीत आपलं नशीब आजमावत होता, तेव्हा त्याने गर्लफ्रेंड सुनिता अहुजाशी लग्न केलं होतं. गोविंदा आणि सुनिता यांनी हे लग्न गुपचूप केलं होतं. बाळ होईपर्यंत त्यांच्या लग्नाविषयी कोणालाच कानोकान खबर नव्हती. आता लग्नाच्या 37 वर्षांनंतर गोविंदा आणि सुनिताच्या संसारात सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. काही मुलाखतींमध्ये सुनिता अप्रत्यक्षपणे गोविंदासोबतच्या नात्यातील नाराजी बोलून दाखवली होती. इतकंच काय तर पुढच्या जन्मी असा नवरा नको, असं तिने थेट म्हटलं होतं.